बदलापूर, १३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : कर्जत आणि बदलापूर येथील रेल्वे प्रवाशांमधील वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. हा वाद मंगळवारी सकाळी चिघळला. सकाळी ७.५१ ची गाडी कर्जतहून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी निघाली. या गाडीतील महिलांच्या डब्याचे दरवाजे बदलापूर स्थानक येण्याच्या आधीच आतून बंद करण्यात आले. आतल्या अनेक महिला प्रवाशांनी बदलापूरच्या महिला प्रवाशांना उघड विरोध केला. यामुळे बदलापूरमधील प्रवाशांची गैरसोय झाली. बऱ्याच वेळानंतर अखेर बदलापूरच्या महिलांना प्रवेश नाकारत गाडी पुढे सरकली. ही घटना महिलांच्या दुसऱ्या श्रेणीच्या डब्यात घडली. गाडीचे दरवाजे बंद असल्याने फलाटावर गोंधळ उडाला. प्रवासी ओरडत असतानाही गाडीतील महिला प्रवाशांनी त्यांची भूमिका कायम ठेवली. या प्रकाराबाबत बदलापूरच्या प्रवाशांनी संताप व्यक्त केला.