Tuesday, December 10, 2024 02:07:48 AM

बाबा सिद्दीकींचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

बाबा सिद्दीकींचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

मुंबई , ८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसचे मुंबईतील मोठे नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याबाबत त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत माहिती दिली. बाबा झियाउद्दीन सिद्दिकी हे वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विधानसभेचे सदस्य (आमदार) होते.

सिद्दीकी पिता - पुत्र राष्ट्रवादीच्या वाटेवर

काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी आणि त्यांचे पुत्र झीशान सिद्दीकी हे दोघे अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. अलिकडेच बाबा सिद्दीकी यांनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीनंतरच राजकीय वर्तुळात सिद्दीकी पिता - पुत्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याआधी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा ज्या दिवशी सुरू होणार होती त्याच दिवशी काँग्रेसचे मुंबईतील माजी खासदार मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. पाठोपाठ सिद्दीकी पिता - पुत्रानेही काँग्रेस सोडली तर तो काँग्रेससाठी दुसरा धक्का असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पण सध्या तरी फक्त बाबा सिद्दीकी यांनीच काँग्रेस पक्ष सोडला आहे. त्यांचा मुलगा अद्याप काँग्रेसमध्ये आहे. झीशान सिद्दीकी हे काँग्रेसचे आमदार आहेत.

कोण आहेत बाबा सिद्दीकी ?

बाबा सिद्दीकी तीन वेळा वांद्रे पश्चिम मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. ते काही काळ अन्न व नागरी पुरवठा खात्याचे राज्यमंत्री आणि म्हाडाच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष होते. याआधी विद्यार्थी नेता म्हणून सुरुवात करणाऱ्या बाबा सिद्दीकी यांनी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून चांगले काम केले. या कामगिरीची दखल घेऊन त्यांना पक्षाने आमदारकीचे तिकीट दिले. बाबा सिद्दीकी १९९९, २००४ आणि २००९ मध्ये आमदार झाले. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीने २०१८ मध्ये बाबा सिद्दीकी यांची ४६२ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. बॉलिवूडमधील संपर्क आणि राजकीय वर्तुळातला प्रभाव यामुळे बाबा सिद्दीकी लोकप्रिय झाले आहेत. काँग्रेस पक्षाने मुसलमान चेहरा म्हणून बाबा सिद्दीकी यांना राजकारणात वारंवार संधी दिली, असेही राजकीय अभ्यासक सांगतात.

'आता काँग्रेसचं दुकान बंद होणार'
सिद्दीकींच्या राजीनाम्यानंतर नितेश राणेंची काँग्रेसवर टीका


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo