डॉक्टर यांच्या नावाच्या आधी डॉ. आणि ॲडव्होकेट यांच्या नावाच्या आधी ॲड. संबोधन लावण्यात येते, त्याच धर्तीवर शिक्षकांच्या नावाच्या आधी इंग्रजीत टीआर आणि मराठीत टी असे संबोधन लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्या वाहनावर देखील हे संबोधन व त्याअनुरूप बोधचिन्ह देखील लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली. राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांना आता ड्रेस कोड लागू होणार आहे. सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील पुरुष आणि महिला शिक्षकांना शाळा निश्चित करेल अशा रंगाचा एकच ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही मंत्री केसरकर यांनी दिली. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार आहे. सर्व शाळांमध्ये राज्यगीत वाजविण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे ते म्हणाले.
शाळांनी ठरवावा पेहरावाचा रंग
पुरुष आणि महिला शिक्षकांकरिता परिधान करावयाच्या पेहरावाचा रंग कोणता असावा हे संबंधित शाळेने निश्चित करावे. पुरुष शिक्षकांच्या शर्टचा रंग हा फिकट असावा आणि पॅन्टचा रंग गडद असावा. पुरुषांना शूज घालावे लागणार आहेत. वैद्यकीय कारण असेल तर बूट घालण्यापासून सूट देण्यात येईल.
असा असेल ड्रेस कोड
- महिला शिक्षकांना साडी अथवा सलवार-चुडीदार, कुर्ता, दुपट्टा असा पेहराव असावा.
- पुरुष शिक्षकांनी शर्ट-ट्राउझर पँट घालावी. शर्ट इन असावा.
- गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम किंवा चित्रे असलेले पेहराव घालू नयेत.
- शिक्षकांनी जीन्स टी-शर्टचा वापर शाळेमध्ये करू नये.