महाराष्ट्र, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : शंभर कोटी रुपयांच्या कथित दारुविक्री घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली. निवडणुकीच्या काळात भाजपाकडून भीती पसरवण्याचे काम सुरू आहे. आधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली. आता अरविंद केजरीवाल यांना अटक केली, उद्या कोणाला अटक करतील माहिती नाही. केजरीवाल यांची अटक चुकीची आहे असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला.
महाविकास आघाडीसह विरोधकांनी अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाईचा कडक शब्दांतून निषेध नोंदवला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही भाजपावर हल्लाबोल केला. शरद पवार यांनी ट्वीटर वर पोस्ट शेअर करत अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाईविरोधात संताप व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडी अरविंद केजरीवाल यांच्यासोबत उभी असल्याची ग्वाही दिली. सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या असताना विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे, याचा तीव्र निषेध आहे. भाजपा सत्तेसाठी किती खाली झुकणार हे या अटकेवरून दिसून येत आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावरील या असंवैधानिक कारवाईविरोधात ‘माविआ’ एकजुटीने उभी आहे, या शब्दांत शरद पवार यांनी टीका केली.