छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी, दि. ९ एप्रिल २०२४ : राज्य पुरातत्व विभागाने अंबाजोगाई येथील पुरातन सकलेश्वर मंदिर परिसरात उत्खनन सुरू केले आहे. मागील दोन आठवड्यात मंदिराच्या पायांचे अवशेष आढळले आहेत. त्यामुळे परिसरात अधिक मंदिर समूह असण्यावर प्रकाशझोत पडण्याची शक्यता आहे.
अंबाजोगाई येथील सकलेश्वर मंदिर (बाराखांबी) परिसरात राज्य पुरातत्व विभागामार्फत उत्खनन सुरू आहे. २०१८ मध्ये भाविकांकडून मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली. त्यावेळी मंदिराच्या पायात खोलवर गेलेल्या झाडांच्या मुळ्या काढताना पुरातन अवशेष आढळले होते. अधिक खोदकाम केल्यानंतर शेकडो पुरातन अवशेष, मुर्ती, शिलालेख सापडले होते. महत्त्वाच्या मूर्ती वस्तूसंग्रहालयात जतन करण्यात आल्या आहेत. या परिसरात उत्खनन करण्याची मागणी अभ्यासक, इतिहासप्रेमींनी केली होती. दरम्यान, या परिसरात महत्त्वाच्या वास्तू आहेत. सकलेश्वर मंदिरासह परिसर राज्य संरक्षित स्मारक करावा, अशी मागणी आहे. याबाबत राज्य पुरातत्त्व विभागाने मागील वर्षी शासनाला प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर निर्णय होऊन राज्य संरक्षित स्मारकात सकलेश्वर मंदिराचा समावेश होण्याची शक्यता आहे.