सांगली, ५ मे २०२४, प्रतिनिधी: वैद्यकीय शाखेच्या प्रवेशाकरिता संपूर्ण देशभरात उद्या, रविवारी ५ मे रोजी ‘नीट’ (युजी)ची परीक्षा होत आहे. यासाठी देशातील ५५७ व परदेशातली १४ केंद्रांवर तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
रविवारी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत परीक्षा होत आहे. देशातील २४ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ‘नीट’ परीक्षेसाठी देशभरातून यंदा २८ लाखांवर अर्ज दाखल झाले होते. अपात्र विद्यार्थ्यांची संख्या वगळल्यानंतर व दुसऱ्यांना अर्जाची संधी दिल्यानंतर २४ लाखांवर विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
नीटसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये मुलांची संख्या १० लाखांवर, तर मुलींची संख्या १४ लाखांच्या घरात आहे.
देशभरात ७०६ वैद्यकीय महाविद्यालयांतून एमबीबीएसच्या १,०९,१४५ जागा असून, यावर्षी या जागा आणखी वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय डेन्टलच्या २७ हजार जागा आहेत. एमबीबीएस, बीडीएस, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी आणि पशुवैद्यकीय या सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश हे नीटच्या गुणांवरच होत असतात.