अकोला: अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतातून कापणी करून ठेवलेले सोयाबीन चोरी करणाऱ्या टोळीचा अखेर अकोला पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. शेख निसार शेख इद्रिस आणि फारूक खान आसिफ खान अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
या टोळीने केवळ सोयाबीन चोरीच नव्हे, तर रेल्वे विभागाच्या 3 टन कॉपर केबल आणि पाणीपुरवठा विभागाच्या गोडाऊनमधील साहित्यही लंपास केल्याचे समोर आले आहे. अकोला पोलिसांनी या दोघांकडून 23 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
टोळीने बाळापूर, पातुर, जुने शहर आणि बार्शीटाकळी परिसरातील शेतकऱ्यांचे सोयाबीन तसेच अकोट ग्रामीण भागातील पाणीपुरवठा विभागाचे साहित्य चोरल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 5 चोरीचे गुन्हे उघड केले आहेत.या यशस्वी कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.