बदलापूर: काही महिन्यांपूर्वी बदलापूर येथे एका शाळेत दोन चिमुकलींवर एका नराधमाकडून अत्याचार करण्यात आला होता. या अत्याचार प्रकरणी आरोपी असलेला आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊन्टर देखील करण्यात आला. मात्र आता न्यायालयीन चौकशी समोर आल्यानंतर अक्षय शिंदेचा एन्काऊंटर कि हत्या? असा प्रश्न सर्वत्र विचारला जातोय.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचा अहवाल मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आलाय. हा अहवाल धक्कादायक असून अक्षय शिंदेच्या एन्काऊन्टरला पाच पोलिसच जबाबदार असल्याचं म्हटलंय. तसेच पोलीसांनी आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा संशयास्पद असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलंय. त्यामुळं हे फेक एन्काऊन्टर असल्याचंही बोललं जातय.
काय आहे अहवाल:
पोलिसांनी अक्षय शिंदेविरुद्ध केलेला बळाचा वापर अनुचित असून अक्षयने बंदुक हिसकावल्यानं स्वसंरक्षणार्थ आम्ही त्याच्यावर गोळ्या झाडल्या, असा दावा पोलिसांनी केला होता. पण संबंधित बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसेच नव्हते, असं या अहवालात म्हटलंय. विशेष म्हणजे या अहवालानंतर मुंबई हायकोर्टाने पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे आता पोलिसांवर कारवाई होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणारे.