विजय चिडे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलानं दिला आहे. दरम्यान याच मुद्यावरून आता राजकारण देखील तापले आहे. तर, दुसरीकडे औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आक्रमक झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी 'छावा' चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर औरंगजेबाच्या कबरीबाबत भावना तीव्र झाल्या. त्यानंतर औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.राज्यभरात औरंगजेबाची कबर काढून टाकण्याच्या मागणीने जोर धरलाय. त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीजवळ कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ३ पोलीस अधिकारी, ३ पीआय आणि 30 पोलिसांसह होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.
हेही वाचा: भारती प्रतापराव पवार यांचे निधन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरच्या पिढ्यांनी औरंगजेबाच्या कबरीला कधी धक्का लावला नाही. शिवरायांच्या वंशजांनी अफजल खानाची कबरही हटवली नाही. मग आताच्या काळातील लोकांना या कबरी हटवण्याची इच्छा का होत आहे, असा सवाल खुलताबाद येथे औरंगजेबाच्या कबरीच्या परिसरात फुले विकणाऱ्या विक्रेत्याने उपस्थित केलाय. कबर हटवून नेमका कोणाला फायदा होणार आहे? औरंगजेबाची कबर हटवून इतिहास बदलणार आहे का ? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने खुलताबाद या ठिकाणी असणारी औरंगजेबाची कबर उकडून फेकण्याचा इशारा देण्यात आला होता. यामुळे संपूर्ण राज्यांतील वातावरण तापलंय.