Sunday, April 20, 2025 06:28:16 AM

पेट्रोल देण्यास नकार दिल्याने लोखंडी रॉड ने हल्ला, घटनेचं CCTV फुटेज व्हायरल

माजलगाव शहरातील एका पेट्रोल पंपावर ही घटना घडली. पेट्रोल भरण्यास नकार मिळाल्याने संतप्त झालेल्या तिघांनी मिळून एका तरुणाला रस्त्यावर पाठलाग करत पकडले आणि लोखंडी रॉडने जबर मारहाण केली.

पेट्रोल देण्यास नकार दिल्याने लोखंडी रॉड ने हल्ला घटनेचं cctv फुटेज व्हायरल

बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. बीडमध्ये काही ना काही विकृती करताना काढलेले  व्हिडिओ समाज माध्यमांवर आपल्या पाहायला मिळतात. या घटना सुरु असतानाच आता धुलीवंदनाच्या दिवशी माजलगावमध्ये भररस्त्यात हल्ल्याचा थरारक प्रकार समोर आला आहे. पेट्रोल देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून तिघांनी मिळून एका तरुणावर लोखंडी रोडने हल्ला केल्याची घटना घडली असून, या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समाज माध्यमावर तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. 

माजलगाव शहरातील एका पेट्रोल पंपावर ही घटना घडली. पेट्रोल भरण्यास नकार मिळाल्याने संतप्त झालेल्या तिघांनी मिळून एका तरुणाला रस्त्यावर पाठलाग करत पकडले आणि लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, एकाने जोरदारपणे तरुणाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार केला, ज्यामुळे तो जागेवरच कोसळला. त्यानंतर इतर दोघांनीही त्याला मारहाण केली.

हेही वाचा: विद्येच्या माहेरघरात कोयता गँगचा थरार – आता घरात घुसून दहशत!

या घटनेचे संपूर्ण दृश्य पेट्रोल पंपाजवळील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून, या व्हिडिओमुळे माजलगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी त्वरित कारवाई करत कृष्णा कांबळे, अरबाज पठाण आणि अर्जुन गरड या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या गुन्हेगारीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असले तरी अशा घटना रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज आहे. प्रशासन गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणते ठोस उपाययोजना करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


सम्बन्धित सामग्री