अहिल्यानगरमध्ये पार पडलेल्या 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत एका वादग्रस्त घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. गादी विभागाच्या अंतिम सामन्यात शिवराज राक्षे आणि पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ यांच्यात चुरशीची लढत रंगली. सामन्यादरम्यान मोहोळच्या एका डावात राक्षे पाठीवर गेल्याने पंचांनी त्याला बाद घोषित केले आणि विजय मोहोळच्या नावावर नोंदवला. मात्र, पंचांचा निर्णय चुकीचा असल्याचा आरोप करत शिवराज राक्षेने आक्रमक पवित्रा घेतला आणि वादाला तोंड फुटले.
सामना संपल्यानंतर राक्षेने संतापाच्या भरात पंचांची कॉलर धरली आणि त्यानंतर त्यांना थेट लाथ मारली. ही घटना सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून कुस्ती विश्वात मोठ्या चर्चेला विषय ठरली आहे. यावर अनेक आजी-माजी कुस्तीपटू आणि पंचांनी प्रतिक्रिया दिल्या. डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनीही या प्रकरणावर धक्कादायक वक्तव्य केले. त्यांनी म्हटले, “शिवराज राक्षेने पंचाला लाथ मारून चुकीचं केलं, पण अशा पंचांना थेट गोळ्या घातल्या पाहिजेत.” त्यांच्या या विधानामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
चंद्रहार पाटील यांनी पुढे सांगितले की, “मी स्वतः 2009 साली ट्रिपल महाराष्ट्र केसरी स्पर्धेत वादग्रस्त निर्णयाचा बळी ठरलो होतो आणि त्यावेळी आत्महत्येचा विचार केला होता.” या प्रकरणानंतर महाराष्ट्रातील कुस्ती संघटनांमध्ये वातावरण तापले असून, पंचांच्या निर्णयांबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. आता या वादावर महाराष्ट्र कुस्ती महासंघ आणि संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका काय असेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.