मुंबई : छत्रपती संभाजीराजे यांच्यावर येणारा छावा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात आला आहे. ट्रेलरमध्ये लेझीम खेळताना जे गाण्याच्या स्वरूपात दृश्य दिसतं यावर शिवप्रेमींनी आक्षेप नोंदवला आहे. यातच आता छावा सिनेमावर सरकारकडून भूमिका घेतल्याचे दिसत आहे. छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह असल्यास खपवून घेणार नाही अशा सूचना छावा चित्रपटाच्या निर्माता दिग्दर्शकांना मंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत. छावा प्रदर्शित होण्यापूर्वी तज्ज्ञ व्यक्तींना दाखवण्याचे निर्देश सामंत यांनी निर्मात्याला दिले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
मंत्री उदय सामंत यांची पोस्ट चर्चेत
धर्मरक्षक,स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनणे ही आनंदाची गोष्ट आहे, छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहे. मात्र या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याबाबत अनेकांनी मते व्यक्त केली आहेत. हा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना आधी दाखवण्यात यावा त्याशिवाय प्रदर्शित करू नये अशी आमची भूमिका आहे. महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही.
चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी तातडीने या बाबत उपाययोजना करून आक्षेपार्ह काही असेल तर काढून टाकलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. चित्रपट पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, त्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही!
हेही वाचा : सरकारी नोंदींप्रमाणे मराठ्यांना कुणबी आरक्षण द्या; जरांगेंची मागणी
साताऱ्याच्या सुहास राजेशिर्के यांच्याकडून छावा चित्रपटातील घटनेचा निषेध
अभिनेता विकी कौशलच्या छावा चित्रपटात इतिहासाची मोडतोड करून काही आक्षेपार्ह सीन घेण्यात येत असल्याचा आरोप होत असतानाच या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी शिवप्रेमींकडून होत आहे. यातच साताऱ्यातील महाराणी येसूबाई फाउंडेशनचे सर्वेसर्वा सुहास राजेशिर्के यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे. छावा चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वेगळा करा. अन्यथा राज्यभर आंदोलन छेडू असा इशारा सुहास राजे शिर्के यांनी दिला आहे.
‘छावा चित्रपटामध्ये काही आक्षेपार्ह असेल तर विरोध असेल’
छत्रपती संभाजीराजे यांच्यावर येणाऱ्या छावा चित्रपटामध्ये काही आक्षेपार्ह असेल तर त्याला विरोध असेल. संभाजी महाराजांच्या नावावर छावा या नावाने नवीन चित्रपट येत आहे ही आनंदाची बाब आहे. ट्रेलरमध्ये लेझीम खेळताना जे गाण्याच्या स्वरूपात दृश्य दिसतं आहे हे सिने लिबर्टी किती योग्य आहे यावर चर्चा केली जाईल. इतिहासकारांना घेऊन चित्रपट पाहिल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असं वक्तव्य माजी खासदार संभाजीराजेंनी केलं आहे.
छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनपटावर येणाऱ्या छावा चित्रपटामध्ये संभाजी राजे हे नृत्य करताना दाखवले आहेत. याला छत्रपती संभाजीराजे प्रेमींनी विरोध करण्याचे ठरवले आहे.