पुणे: राज्यात चिकनगुनियाचा धोका झपाट्याने वाढत असून आरोग्य यंत्रणेसाठी हा एक गंभीर इशारा ठरतोय. राज्यभरात या आजाराच्या रुग्णसंख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या पंधरवड्यात दुपटीने वाढ झाली आहे.1 ते 16 जानेवारीदरम्यान राज्यात चिकनगुनियाचे तब्बल 130 रुग्ण आढळले आहेत.
ही स्थिती चिंताजनक असून आरोग्य विभागाकडून राज्यभर विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. चिकुनगुनिया हा डासांमुळे पसरणारा संसर्गजन्य आजार असल्याने नागरिकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे.
चिकुनगुनियावर उपाय:
डास निर्मूलन मोहीम: घराच्या आसपास असलेल्या साचलेल्या पाण्याचा त्वरित निचरा करावा.
स्वच्छता राखा: घर आणि परिसर स्वच्छ ठेवा. डासांची उत्पत्ती होऊ शकणार नाही याची काळजी घ्या.
डास प्रतिबंधक वापरा: मच्छरदाणी, निरोधक / रिपेलंट्सचा वापर करा.
आरोग्य तपासणी: ताप, सांधेदुखी, आणि त्वचेवर चट्टे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
जनजागृती मोहीम: स्थानिक प्रशासनाने नागरिकांमध्ये चिकुनगुनियाच्या प्रतिबंधक उपायांबाबत जागृती करावी.
राज्यातील आरोग्य यंत्रणेने सक्रिय राहून उपाययोजना राबविल्यास आणि नागरिकांनी सजग राहून साथरोग प्रतिबंधक नियमांचे पालन केल्यास चिकुनगुनियाच्या फैलावावर नियंत्रण मिळवता येईल.