'आम्ही काय रस्त्यावर पडलोय का?', चित्रा वाघ यांचा सुषमा अंधारेंना सवाल
मुंबई: विधानपरिषदेत दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून मोठा गदारोळ झाला. या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले. खासकरून भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार चित्रा वाघ यांचं नाव घेऊन त्यांनी मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तेव्हा चित्रा वाघ यांनी सडेतोड उत्तर देत परब यांना खडेबोल सुनावले. या घटनेनंतर आज सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केला. त्याला चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं आहे.
सभागृहात अनिल परब यांच्याबाबत बोलताना चित्रा वाघ आक्रमक झाल्या. त्यांनी मी तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते, असं वक्तव्य केलं. त्यांच्या या विधानावर सुषमा अंधारे यांनी खोचक टीका केली आहे. त्यांनी आकडा कमीच सांगितला, असं लोक म्हणतात, असं ट्विट केलं आहे.
अंधारे यांच्या ट्विटला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. वाघ यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, जर आमच्यावर कोणी बोलणार असेल तर आम्हीही प्रत्युत्तर देऊ. आम्ही काय रस्त्यावर पडलोय का? मी कोणाच्याही कॅरेक्टरवर बोलत नाही. पण जर वारंवार आमच्यावरच निशाणा साधला जाणार असेल तर आम्हीही गप्प बसणार नाही. हम किसीको छेडते नही, पर अगर किसीने छेडा तो छोडते भी नही.., असं वाघ यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - Aurangzeb Tomb Row: मोठी बातमी! औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. पण माझ्यावर ज्या पद्धतीने टीका केली जाते आहे. किती वेळा माझ्या कॅरेक्टरवर बोलणार? या अगोदरचे बोलून बोलून थकले आता हे नवीन आल आहे. तुम्ही उठणार आणि आमच्या कॅरेक्टवर बोलणार, मी माझी भूमिका मांडली. त्यात ह्या बाईचं काय होतं का? मी तर एकच प्रश्न विचारला. तेही तो माणूस पत्रकार परिषद घेऊन सांगतो हे करा आणि ते करा. कुणाच्या लेकरावर बोलायला मलाही त्रास होतो ओ.. पण आम्ही काय रस्त्यावर पडलोय का, असा सवाल चित्रा वाघ यांनी नाव न घेता सुषमा अंधारे यांना विचारला. वाघ यांच्या ट्विटनंतर अंधारे यांनीही पुन्हा ट्विट केलं आहे. यात त्यांनी सभागृहाची पातळी घसरवणारी वक्तव्ये भाजपकडून केली जात आहेत, अशी टीका केली आहे.
हेही वाचा - Hinjawadi Bus Fire Case: हिंजवडीतील मिनीबस जळीतकांडासंदर्भात मोठे अपडेट! 'या' कारणामुळे चालकानेचं रचला कट
या वादामुळे विधानपरिषद आणि विधानसभा अशा दोन्ही ठिकाणी वातावरण तापलं. अखेर हा वाद मिटवण्यासाठी विधानसभेच्या अध्यक्षांच्या दालनात बैठक पार पडली. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील आणि दोन्ही नेते उपस्थित होते.