विरारमध्ये बारावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका जाळून खाक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 10 मार्च रोजी विरार पश्चिमेच्या बोलींज नानभट रोड येथील गंगुबाई अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी घरी नेणाऱ्या शिक्षिकेच्या घराला आग लागली आणि या आगीत संपूर्ण उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या आहेत.
शिक्षण मंडळाच्या नियमानुसार उत्तरपत्रिका शाळेतच तपासायच्या असतात. मात्र, या प्रकरणात संबंधित शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी नेल्या होत्या, यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. उत्तरपत्रिका जळल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात आले असून पालकांमध्ये प्रचंड चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाणार का, अशी भीती पालकांमध्ये निर्माण झाली आहे.
या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित शिक्षिकेवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालक आणि विद्यार्थी करत आहेत. शिक्षण मंडळ यावर काय निर्णय घेणार आणि विद्यार्थ्यांच्या निकालाची काय व्यवस्था केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.