परभणी : परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती. एका माथेफिरुने मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान त्या संविधानाच्या प्रतीची विटंबना केली. संविधानाच्या प्रतीची विटंबना झाल्यानंतर परभणी शहरातील आंबेडकर अनुयायी प्रचंड संतप्त झाले. शहरातील मोठ्या संख्येने अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात जमा झाले. त्या ठिकाणी प्रचंड घोषणाबाजी झाली आणि त्यानंतर संतप्त अनुयायांनी उभ्या असलेल्या गाड्यांवर दगडफेक केली. तसेच परभणी रेल्वे स्थानकात जाऊन मुंबईकडे जाणारी नंदीग्राम एक्सप्रेस देखील रोखली. दरम्यान संविधानाच्या प्रतीची विटंबना करणाऱ्या माथेफिरुला परभणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
परभणी शहरात प्रचंड तणावाचे वातावरण असून संपूर्ण शहर कडकडीत बंद आहे. दरम्यान संविधानाच्या प्रतीची विटंबना करणाऱ्या माथेफिरुला परभणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच या घटनेच्या मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे.
परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असणाऱ्या परिसरात एका व्यक्तीकडून संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्यात आली. यामुळे आंबेडकर अनुयायी प्रचंड संतप्त झाले. आंबेडकरांचे अनुयायी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा परिसरात जमा झाले. त्यानंतर त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संतप्त आंदोलकांनी पाईप पेटवले. दुकानाबाहेरील साहित्य आणि बोर्डची तोडफोड केली. एवढेच नाही तर जमावाकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक देखील करण्यात आली. परभणीतील बंदाला हिंसक वळण आले आहे. परभणी शहरात मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. पोलिसांकडून घटनेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांकडून जमावावर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आहे. आंदोलकांनी दुकानं आणि वाहनांवर दगडफेक केल्याने आंदोलक आणि पोलिस आमने सामने आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आंदोलकांकडून जाळपोळ करण्यात आली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.