Friday, March 21, 2025 08:39:28 AM

मनोज जरांगेच्या मेहुण्यांवर तडीपारीचा कारवाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

कोणाचा साला आहे. कोणाचा नातेवाईक आहे हे पाहून कारवाई केली जात नाही. एखाद्याने काही गुन्हा केला असेल तर कारवाई होत असते, अटक होत असते, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

मनोज जरांगेच्या मेहुण्यांवर तडीपारीचा कारवाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

जालना जिल्हा प्रशासनाने वाळू माफिया आणि गुन्हेगारांवर तडीपीरीची कारवाई नोटीस जारी केली आहे. ही कारवाई ९ जणांविरोधात करण्यात आली आहे. यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यासह जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील ५ जणांचा समावेश आहे. या कारवाईवर मनोज जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीस यांच्यावर गंभीर आरोप केले. आता जरांगे पाटलानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाई प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली.    

 

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी यांना मनोज जरांगे पाटील यांचे मेहुणे विलास खेडकर यांच्यावरिल कारवाईविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, कोणाचा साला आहे. कोणाचा नातेवाईक आहे हे पाहून कारवाई केली जात नाही. एखाद्याने काही गुन्हा केला असेल तर कारवाई होत असते, अटक होत असते. माझ्याकडे या प्रकरणाची संपूर्ण माहिती नाही. योग्य ती माहिती घेऊन मी तुम्हाला सांगेन.”  

अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशाने, मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह ९ वाळू माफिया आणि अटल गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. जरांगेंचा मेहुणा विलास खेडकर याला जालना, बीड आणि परभणी या ३ जिल्ह्यांमधून तडीपार करण्यात आले आहे.    

 

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले

मेहुण्याला नोटीस मिळताच मनोज जरांगे पाटील यांनी तिखट शब्दात फडणवीस यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, आम्ही केसेस मागे घेऊन असे फडणवीस सांगतात. तर दुसरीकडे नोटिसा पाठवण्याचे काम ते करत आहेत. आमची भूमिका कायम असून तुम्ही आमच्या सरळ स्वभावाचा फायदा उचलू नये. अंतरवलीतील आंदोलकांना जर अशा नोटीस पाठवणार असाल, तर मी सोडणार नाही. तुम्ही जर मराठ्यांना वेठीस धरायचे काम केले तर, तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही.”

दरम्यान, जरांगे पाटील यांचे उपोषण सोडून १२ दिवस झाले तरी दिलेल्या आश्वासनांतील एकाही आश्वासनाची पूर्तता शासनाने केलेली नाही. त्यामुळे आता अंतरवाली सराटीत १५ फेब्रुवारीपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करणार असल्याचे देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.

 


सम्बन्धित सामग्री