कोल्हापूर: वाल्मीक कराड सीसीटीव्ही प्रकरणाबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी गंभीर आरोप केले असून त्यांनी या प्रकरणात ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदविणे अपरिहार्य असल्याचे मत मांडले आहे. तसेच, धनंजय मुंडे यांना नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा लागेल, अशी मागणी त्यांनी केली आहे.
संभाजीराजेंनी म्हटले की, “या व्हिडिओमुळे मर्डरचे कनेक्शन बऱ्यापैकी स्पष्ट होत आहे. आमचे सरकारला मागणी आहे की, मोकाच्या अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यापेक्षा हत्येचा गुन्हा (३०२) नोंदवला जावा. धनंजय मुंडे यांच्याविरोधातील आरोपांमुळे त्यांचे मंत्रीपद बरोबर नाही. नैतिकदृष्ट्या त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. जर मुंडे पूर्णपणे निर्दोष असतील, तर सरकारने त्यांना पालकमंत्री पद दिले नसते. हे स्पष्ट होते की, ते दोषी असल्यामुळे त्यांना पालकमंत्री पद दिलेले नाही.”
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
धनंजय मुंडेंवर आरोप आणि राजीनाम्याची मागणी
संभाजीराजे म्हणाले, “धनंजय मुंडे फार मोठ-मोठ्या गोष्टी बोलतात, पण त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. वाल्मीक कराड यांच्या कनेक्शनचे पुरावे स्पष्ट आहेत. देशभर या प्रकरणाची चर्चा होत आहे. असे असूनही मंत्रीपद सोडण्याची तयारी धनंजय मुंडेंनी दाखवलेली नाही.”
गडकिल्ल्यांचे अतिक्रमण आणि संरक्षण
संभाजीराजेंनी गडकोट किल्ल्यांवरील अतिक्रमणांबद्दल सरकारला सुनावले. त्यांनी म्हटले, “छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले ही आपली जीवन स्मारके आहेत. विशाळगडवरील अतिक्रमण काढण्यासाठी मी स्वतः गेलो होतो. त्या ठिकाणी दोन धर्मांमध्ये तणाव निर्माण झाला होता. पुन्हा असे घडू नये, यासाठी सरकारने योग्य खबरदारी घ्यावी. गडावर व्यावसायिक अतिक्रमण राहता कामा नये.”
जरांगे पाटलांना शुभेच्छा
संभाजीराजेंनी जरांगे पाटील यांना त्यांच्या लढ्याबद्दल शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
संभाजीराजे छत्रपती यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले असून राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच, गडकिल्ल्यांचे अतिक्रमण रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
👉👉 हे देखील वाचा : सैफ अली खानची संपत्ती जप्त होणार?