Sunday, February 16, 2025 11:59:45 AM

Anjali Damania press conference
धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार; अंजली दमानिया पत्रकार परिषदेत संतोष देशमुख हत्या प्रकरणी करणार मोठा गौप्यस्फोट

अंजली दमानिया आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत दमानिया धनंजय मुंडे यांच्याविरोधात धक्कादायक खुलासे करत त्यासंदर्भातील पुरावे देखील सादर करणार आहेत.

धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार अंजली दमानिया पत्रकार परिषदेत संतोष देशमुख हत्या प्रकरणी करणार मोठा गौप्यस्फोट
Anjali Damania, Dhananjay Munde

महाराष्ट्रभर चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची काही दिवसांपूर्वी हत्या (Murder) करण्यात आली होती. त्यातील काही आरोपी पकडले असून त्यामध्ये बीड जिल्ह्यातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या जवळचा मानला जाणारा कार्यकर्ता वाल्मिक कराड याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी पुढाकार घेऊन मंत्री धनंजय मुंडे व त्यांच्याशी जवळीक असणारे वाल्मिक कराड यांच्यावर आरोप केले होते. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांचे आणि वाल्मिक कराड यांचे काही ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग असल्याचा दावा देखील अंजली दमानिया यांनी केला होता. 

आता अंजली दमानिया आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत दमानिया धनंजय मुंडे यांच्याविरोधात धक्कादायक खुलासे करत त्यासंदर्भातील पुरावे देखील सादर करणार आहेत. हे पुरावे पाहून मुंडें यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. अंजली दमानिया आज पत्रकार परिषद कोणता गौप्यस्फोट करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

संतोष देखमुख यांची हत्या - 

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या गावालगत आवादा कंपनीचे काम करण्याच्या अनुषंगाने केज तालुक्यातील काही राजकीय कार्यकर्त्यांनी दमदाटी करून खंडणी मागण्याचा प्रयत्न आवादा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना केला होता. त्यावेळी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये वादविवाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी आलेल्या सरपंच देशमुख यांचे अपहरण करण्यात आले आणि नंतर त्यांची हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले होते. 

गेल्या 56 दिवसांमध्ये शेकडो खुलासे - 

दरम्यान, आष्टी विधानसभेचे आमदार सुरेश धस व सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सतत सरकार विरोधात आवाज उठवून कुठल्याही परिस्थितीत स्वर्गीय संतोष देशमुख यांचा खून केलेले आरोपी तात्काळ अटक करा, अशी मागणी केली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येविषयी गेल्या 56 दिवसांमध्ये शेकडो खुलासे झाले. पण त्या भोवती वेगाने फिरणारा महाराष्ट्राचा राजकारण अजूनही थांबलेलं नाही. राज्याच्या राजकारणावर आणि समाजकारणावर आजही या हत्याकांडाचा परिणाम दिसून येत आहे. या हत्याकांड नंतर सुरू असलेल्या मालिकेत आजही अनेक घटना घडताना दिसत आहेत. अजूनही त्यातील एक आरोपी कृष्णा आंधळे  फरार आहेत.

भगवान गड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी - नामदेव शास्त्री  

तथापी, मंत्री धनंजय मुंडे यांनी मागील आठवड्यात श्रीक्षेत्र भगवानगड येथे भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली होती. त्यानंतर नामदेव शास्त्री महाराजांनी गड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर अंजली दमानिया यांनी अनेक पुरावे भगवानगडावर पाठवून धनंजय मुंडे यांच्या राजीनामा घ्यावा, अशी विनंती नामदेव शास्त्रींना करणारा आहे, असे  म्हटलं आहे.

धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ? 

दिवसेंदिवस धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसतं आहे. त्यातच आज अंजली दमानिया पत्रकार परिषद घेऊन संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी काही पुरावे सादर करणार आहेत. तसेच या नंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. 
 


सम्बन्धित सामग्री