१३ जुलै, २०२४ सोलापूर : माळशिरस येथून निघालेली माऊलींची पालखी खुडूस फाटा येथे आली. इथे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण पार पडलं.
शनिवारी १३ जुलै रोजी खुडूस फाटा येथे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण पार पडलं. भर उन्हात माऊलींचे वारकरी खुडूस फाटा मैदानात माऊलींच्या पालखी सोहळ्याची वाट पाहात होते. जेव्हा पालखी मैदानात आली तेव्हा अवघा आसमंत ज्ञानेश्वर माऊलींच्या जयघोषानं दुमदुमून गेला. या रिंगण सोहळ्यासाठी मैदान सुशोभीत करण्यात आलं होतं. रिंगण सोहळ्याच्या वेळी झेंडेकऱ्यांनी मैदानात चार फेऱ्या मारल्या, पाचव्या फेरीला माऊलींचा अश्वाने मैदानात धावायला सुरुवात केली. पाठोपाठ चोपदारांचा अश्व होताच. माऊलींच्या अश्वाची दौड झाली आणि अश्वाच्या पायाखालची माती कपाळी लावण्यासाठी वारकऱ्यांची एकच झुंबड उडाली. अशा पद्दतीने माऊलींचं दुसरं गोल रिंगण खुडूस फाटा येथे पार पडलं.