Sunday, April 20, 2025 05:02:49 AM

डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जोतिबा डोंगरावर स्वच्छता मोहीम

जोतिबा डोंगरावर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जोतिबा डोंगरावर स्वच्छता मोहीम

कोल्हापूर: श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर 12 एप्रिल रोजी चैत्र यात्रेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या यात्रेसाठी 8 ते 9 लाख भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. मात्र, यात्रेनंतर डोंगर परिसरात प्रचंड घनकचरा निर्माण झाला होता.

या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत जोतिबा डोंगर पायरी मार्ग, बस स्थानक परिसर, सेंट्रल प्लाझा, मुख्य पार्किंग, दर्शन रांग, जोतिबा व यमाई मंदिर परिसर, भक्त निवास अशा विविध ठिकाणी काम करण्यात आले.  मोहिमेत अनेक स्वयंसेवक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते आणि या मोहिमेदरम्यान आणि तब्बल 38 टन कचरा एकत्र करून परिसर पुन्हा स्वच्छ करण्यात आला.

या उपक्रमात प्रतिष्ठानचे स्वयंसेवक तर सहभागी होतेच, पण त्याचबरोबर वारणा बझारच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे, पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांचाही सक्रिय सहभाग लाभला.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपणारे संस्थान आहे. याआधीही त्यांनी रक्तदान, सर्व रोग निदान शिबिरे, वृक्षारोपण आणि ग्रामस्वच्छता अभियानांद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवले आहेत. दरम्यान, श्री क्षेत्र जोतिबा स्वच्छता मोहिमेतील या अद्वितीय योगदानामुळे जोतिबा डोंगर पुन्हा एकदा स्वच्छ, सुंदर व भाविकांसाठी स्वागतार्ह बनला आहे. 


सम्बन्धित सामग्री