Thursday, March 20, 2025 04:14:29 AM

उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या संचालकाकडून महिला शिक्षकांना मारहाण आणि लैंगिक छळ

राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी अकोला जिल्ह्यातील सरकार अनुदानित उर्दू शाळांना भेटी दिल्या आहेत. या भेटीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.

 उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या संचालकाकडून महिला शिक्षकांना मारहाण आणि लैंगिक छळ

अकोला : राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी अकोला जिल्ह्यातील सरकार अनुदानित उर्दू शाळांना भेटी दिल्या आहेत. या भेटीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. अकोला जिल्ह्यातील पातुर येथे अल्हाज सलीम जकरिया उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या संचालकाकडून महिला शिक्षकांना मारहाण आणि लैंगिक छळाच्या तक्रारी आल्या आहेत. याप्रकरणी प्यारे खान यांनी पोलिसांना संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच पुढच्या काळात राज्यभरातील उर्दू शाळांमधील गैरव्यवहारांविरोधात साफसफाई मोहीम राबवणार असल्याचे प्यारे खान यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी सध्या राज्यातील सरकार अनुदानित उर्दू शाळांंच्या गैरकारभाराची साफसफाई सुरू केली. आज प्यारे खान यांनी अकोला जिल्ह्यातील पातुरमधल्या उर्दू शाळांना भेटी दिल्या. अकोला जिल्ह्यातील पातूरचे काँग्रेस नेते सय्यद कमरोद्दीन यांच्या शाळा संदर्भात जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. जिल्हाभरात त्यांच्या 22 अनुदानित शाळा आहेत. या शाळांमध्ये सर्रासपणे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर संस्थाचालकाकडून मारहाण आणि लैंगिक छळाच्या तक्रारी आल्या.

हेही वाचा : ‘दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डीचे ग्रामस्थ आक्रमक; ग्रामस्थांनी घेतला निर्णय
 

प्यारे खान यांच्या दौऱ्या दरम्यान शिक्षिकांकडून संस्थाचालकांच्या विरोधात अत्यंत गंभीर तक्रारी करण्यात आल्या. शाळेतील शिक्षकांच्या वेतनातून संस्था त्याचा निम्मा पगार घेत असल्याचा आरोप करण्यात आला. यासोबतच संस्थाचालक सैय्यद कमरोद्दीन लैंगिक, मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याची तक्रार प्यारे खान यांच्याकडे करण्यात आली. तर प्यारे खान आपण निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार केल्यामुळे आपल्या शाळांवर कारवाईसाठी पुढाकार घेत असल्याचा दावा संस्थाचालकांनी केला. या संपूर्ण गंभीर प्रकरणात पोलीस कारवाई करण्याचे आदेश अल्पसंख्यांक आयोगाने अकोला पोलिसांना दिले आहेत. तर लवकरच चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. 

राज्यातील उर्दू शाळांच्या माध्यमातून सरकारला हजारो कोटींचा चुना लावला जात असल्याचा आरोप प्यारे खान यांनी केला. त्यामुळे पुढच्या काळात राज्यातील उर्दू शाळांमधील हा गोरखधंदा राज्य अल्पसंख्यांक आयोग उघड करणार आहे. यातून राज्यातील उर्दू शाळांमधला हजारो कोटींचा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते.

हेही वाचा : पालकमंत्रिपदावरुन शिवसेना - राष्ट्रवादीत वाढला दुरावा


 


सम्बन्धित सामग्री