Friday, April 25, 2025 10:07:30 PM

धुलीवंदनाचा आनंद दु:खात बदलला, घोडाझरी तलावात 5 युवकांचा मृत्यू

घोडाझरी तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी घडली आहे.

धुलीवंदनाचा आनंद दुखात बदलला घोडाझरी तलावात 5 युवकांचा मृत्यू
घोडाझरी तलावात 5 युवकांचा मृत्यू

चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज शनिवारी (दि. १५) सायंकाळी घडली आहे. धुलीवंदनाचा उत्सव साजरा करून सुट्टी घालवण्यासाठी आलेल्या चिमूर तालुक्यातील साठगाव कोलारी येथील सहा मित्रांनी तलावात पोहण्याचा निर्णय घेतला. पण पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यातील पाच जण पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले आणि त्यांचा मृत्यू झाला. एका मित्राला सुदैवानं वाचवण्यात यश आलं.

जनक गावंडे, यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे आणि तेजस ठाकरे अशी मृतांची नावे आहेत. मृतांचे वय साधारणत: २० ते २५ वर्षे इतके होते. या घटनेत एका तरुणाचा जीव बचावला आहे. 

हेही वाचा - Nashik: ठाकरेंच्या खासदारांनी घेतली भाजपच्या पदाधिकाऱ्यांची भेट

सविस्तर घटना अशी की, ही सर्व मुले शनिवारी घोडाझरी तलाव परिसरात फिरण्यासाठी आली होती. सायंकाळी चारच्या सुमारास त्यांनी तलावात पोहण्याचा निर्णय घेतला. पण खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. 

घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार उमेश कावळे, ठाणेदार कोकोटे, माजी जि.प.सदस्य संजय गजपुरे, तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रमोद चौधरी, नागभीड नगरपरिषदेचे माजी सभापती सचिन आकुलवार आदी घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने तातडीने शोधमोहीम राबवली आणि मृतदेह बाहेर काढले. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.

हेही वाचा - देशमुखांचा खटला चालविणाऱ्या न्यायाधीशांबाबत दमानियांनी केला खळबळजनक दावा

दरम्यान, या घटनेमुळे साठगाव कोलारी गावावर शोककळा पसरली आहे. मृतांपैकी जनक गावंडे हा भंडाऱ्याच्या वरठी येथील सनफ्लॅग कंपनीत नोकरीला होता. तर यश गावंडे नागपूरमध्ये इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाला शिकत होता. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


सम्बन्धित सामग्री