२२ जुलै, २०२४ छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारती भोवतीच मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त कचरा साचला आहे. तसेच, अवतीभवती पाण्याचे डबके साचले आहे. यामुळे, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
एकीकडे, जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने जिल्हाभरात स्वच्छतेसाठी विविध उपक्रम आणि मोहीमा राबविलया जात आहेत. ओला आणि सुका कचरा वेगळा करून परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले जात आहे. तर दुसरीकडे, जिल्हा परिषदेच्या इमारतीत आणि सभोवताली घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. यापूर्वी देखील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतेच्या संदर्भात उपक्रम राबवले गेले होते. त्याबरोबरच जनजागृती ही केली होती. शिवाय अनेक ग्रामपंचायतीला स्वच्छतेसंदर्भात पुरस्कार देऊन सन्मानितही करण्यात आले होत्र. मात्र, जिल्हा परिषदेच्या मुख्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे आणि गवतही वाढले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या इमारतीत कोण स्वच्छतेची मोहीम राबविणार ?, असा सवाल उपस्थित होत आहे.