पुणे : पुण्यात जीबीएस (गुइलेन-बॅरे सिंड्रोम) आजाराने चिंता निर्माण केली आहे. एका दिवसात 28 रुग्णांची नोंद झाली असून, रुग्णसंख्या 101 वर पोहोचली आहे. त्यात 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. याचदरम्यान, पुण्यात दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील धायरी परिसरात 40 वर्षीय व्यक्तीला जीबीएसची लागण झाली होती, तो उपचारासाठी सोलापूरच्या रुग्णालयात दाखल झाला, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
जीबीएसच्या रुग्णांचा तपास राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे केला गेला आहे. दूषित अन्न आणि पाण्यामुळे हे जीवाणू आणि विषाणू पसरल्याची शक्यता आहे. काही रुग्णांमध्ये ‘कॅम्पायलो बॅक्टर जेजुनी’ आणि ‘नोरो व्हायरस’ विषाणू आढळले आहेत. हे सर्व दूषित अन्न आणि पाण्यामुळे होऊ शकते, आणि याची लक्षणे पोटदुखी, उलट्या आणि जुलाब अशी असतात.
जीबीएस गंभीर असू शकतो, पण योग्य उपचार घेतल्यास रुग्ण बरे होऊ शकतात. पोटदुखी, मुंग्या येणे, श्वास घेण्यास त्रास जाणवला तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. आयव्हीआयजी आणि प्लाझ्मा एक्स्चेंज सारखे उपचार यामुळे बरे होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे दूषित अन्न टाळा आणि स्वच्छ पाणी प्या.