हिंगोली : जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गिरगाव येथील शेतकऱ्यांची जय बिरसा ट्रायबल फार्मर प्रोड्युसर कंपनीकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक नैताम याने शेतकऱ्यांना 50% अनुदानावर ट्रॅक्टर देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केली.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील चिंचोली येथील अशोक नैताम मागील वर्षी गिरगाव येथे आला होता. त्याने शेतकऱ्यांशी संवाद साधून ट्रॅक्टर खरेदीसाठी अर्ध्या किंमतीत अनुदान मिळेल असे आश्वासन दिले. गिरगाव येथील चंद्रकांत नादरे, केशव शेवलीकर, व अंकुश नादरे यांनी त्याच्या आमिषाला बळी पडत आरटीजीएस व फोन पेद्वारे 15 लाख रुपये दिले. नैतामने ऑक्टोबर 2024 पर्यंत संपर्क ठेवला, मात्र त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला.
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
काही दिवसांपूर्वी तुमसर पोलिसांनी नैतामला अटक केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे या शेतकऱ्यांच्या लक्षात आले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रवी नादरे यांच्या मदतीने या प्रकरणाचा उलगडा झाला. शेतकऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
अशोक नैताम याने फक्त गिरगावच नाही, तर भंडारा जिल्ह्यातील व विदर्भातील शेकडो शेतकऱ्यांची अशा प्रकारे फसवणूक केल्याचे पुढे आले आहे. ट्रॅक्टर देण्याच्या आमिषाने शेतकऱ्यांकडून लाखो रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार गंभीर असून, या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
👉👉 हे देखील वाचा : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्र सज्ज!