महाराष्ट्राने देशातील प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यांना मागे टाकत सोयाबीन खरेदीत अव्वल स्थान प्राप्त केले आहे. राज्यातील 3 लाख 69 हजार 114 शेतकऱ्यांकडून 7 लाख 81 हजार 447 मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झाली आहे, जी इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अडचण येऊ नये म्हणून खरेदी प्रक्रिया वेगाने केली जात आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 ते 3 दिवसांत रक्कम पोहोचवण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. तसेच, 31 जानेवारी 2025 पर्यंत सोयाबीन खरेदी सुरू राहील, आणि गरज भासल्यास केंद्राकडे खरेदीची मुदत वाढवून मागण्यात येईल.
राज्य सरकारने नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून राज्यस्तरीय नोडल एजन्सीद्वारे सोयाबीन खरेदी प्रक्रिया सुरू केली आहे. 1 ऑक्टोबर 2024 पासून शेतकऱ्यांची नोंदणी सुरू केली होती आणि 15 ऑक्टोबर 2024 पासून खरेदी केंद्रांवर खरेदी सुरू झाली. सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या, पण त्या दूर करून खरेदी वेगाने सुरू ठेवण्यात आली आहे.
राज्यातील नांदेड आणि हिंगोली जिल्हे सर्वोच्च खरेदी केंद्र ठरले असून, नांदेडमध्ये 57 हजार 528 शेतकऱ्यांकडून 1 लाख 290 मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झाली आहे.
केंद्र सरकारने 2024-25 साठी प्रति क्विंटल 4892 रुपये हमीभाव घोषित केला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत 292 रुपये अधिक आहे.