महाराष्ट्राच्या विधानसभेत महायुतीला मिळालेल्या घवघव्या यशानंतर आज मुंबईत महायुती सरकारचा शपथविधी सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. संध्याकाळी 5:30 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी ठाण्यातील महागिरी कोळीवाड्यातून पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने कोळी बांधव सहभागी झाले होते.
ठाण्यातील भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक जयेंद्र कोळी आणि नम्रता कोळी यांच्या नेतृत्वाखाली कोळी बांधवांनी आझाद मैदान गाठले. कोळी बांधवांनी आपली खास परंपरा जपत कोळी वेशभूषेत उपस्थित राहून उत्साहाने सहभाग नोंदवला. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने शपथविधी सोहळ्याला एक वेगळीच पारंपरिक रंगत आले.
कोळी बांधवांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देताना त्यांच्या नेतृत्वाखाली कोळीवाड्यांचे प्रश्न सुटतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. गेल्या पाच वर्षांपासून फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर पाहण्याची इच्छा होती, ती आज पूर्ण झाल्याचा आनंद कोळी बांधवांच्या चेहऱ्यावर दिसून आला.
“आमचे अनेक प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मार्गी लागतील, अशी आशा आहे,” असे कोळी बांधवांनी सांगितले. या उत्साही क्षणी सहभागी होण्यासाठी कोळी बांधवांनी मोठ्या जल्लोषात मुंबईला येऊन महायुती सरकारच्या स्थापनाचा आनंद साजरा केला.