भंडारा : जिल्ह्यातील जवाहर नगर येथील आयुध निर्माण कंपनीत शुक्रवारी सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास भीषण स्फोट झाला. कंपनीच्या सी सेक्शनमध्ये हा स्फोट झाल्याचे प्राथमिक माहिती आहे. स्फोटाच्या वेळी या ठिकाणी २० ते २५ लोक काम करत असल्याचे समजते. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त असून सात ते आठ जण गंभीर जखमी आहेत. जखमींना नागपूर व भंडारा येथील रुग्णालयात तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज जवळपास पाच किमी परिसरात ऐकू गेला. या स्फोटाची तीव्रता किती प्रचंड होती याचा अंदाज यावरून लावता येतो. स्फोटामुळे संपूर्ण सी सेक्शन उद्ध्वस्त झाले असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी पोलिस व आरोग्य विभागाचा फौजफाटा तैनात असून, जखमी व मृतदेह बाहेर काढण्याचे कार्य सुरू आहे.
👉👉 हे देखील वाचा : महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार?
घटनेनंतर जवाहर नगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्फोटामुळे परिसरातील डझनभर गावांवर परिणाम झाला असून, नागरिक कंपनीच्या मुख्य गेटवर मोठ्या प्रमाणावर जमले आहेत. आपले नातेवाईक सुखरूप आहेत की नाही याची माहिती घेण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे.
सदर कंपनीत आरडीएक्स व दारूगोळ्याचे उत्पादन केले जाते. स्फोट झाल्यानंतर कंपनीचे मुख्यद्वार सील करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलिस विभाग, तहसीलदार व इतर प्रशासकीय अधिकारी पोहोचले असून, एसडीआरएफला तातडीने पाचारण करण्यात आले आहे.
गेल्या काही महिन्यांत दुसरी दुर्घटना
विशेष म्हणजे, जानेवारी २०२४ मध्येही याच कंपनीत स्फोट झाला होता. त्या वेळी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. सनफ्लॅग कंपनीत याआधी घडलेल्या स्फोटामुळे तीन कर्मचारी भाजले होते. भंडारा जिल्ह्यातील अशा अपघातांमुळे स्थानिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
स्फोटाचे परिणाम व पुढील उपाययोजना
घटनास्थळी अधिकृत तपासणी सुरू असून स्फोटाचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. कंपनीतील सुरक्षा उपायांचीही पुन्हा तपासणी होणार आहे. या दुर्घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.