Malhargad Incident: किल्ल्यावर कपलचा रोमान्स; व्हिडिओ काढल्याने दुर्गप्रेमीच्या डोक्यात दगडाने हल्ला
पुणे जिल्ह्यातील सासवड येथे असलेल्या ऐतिहासिक मल्हार गडावर एक धक्कादायक घटना घडली आहे. गडावर एक जोडपे अश्लिल चाळे करत होते. तेव्हा तिथे असलेल्या दुर्गप्रेमीने त्या जोडप्याला हटकले. ही बाब त्या जोडप्याला रूचली नाही. त्या जोडप्याला राग अनावर झाला आणि त्या जोडप्याने दुर्गप्रेमीवर प्राणघातक हल्ला केला. यात दुर्गप्रेमी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर संपूर्ण सासवड परिसरात खळबळ उडाली आहे.
मल्हारगड हा पुण्याजवळील एक महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला आहे. अनेक दुर्गप्रेमी येथे गड भ्रमंतीसाठी आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी येत असतात. प्रमोद जगताप हा देखील अशाच दुर्गप्रेमींमधील एक आहे. नेहमीप्रमाणे गडावरील स्वच्छता आणि निगराणीसाठी गेलेल्या प्रमोद याने एका जोडप्याला गडावर अश्लील कृत्य करताना पाहिले. गडाची ऐतिहासिक महत्त्व आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अशा प्रकाराला आळा बसावा, यासाठी त्याने त्या जोडप्याला समज दिली. तसेच त्याने जोडप्याचे काही फोटो आणि व्हिडिओ शुट केले.
हेही वाचा - पुण्यातील शिवशाही बसमधील अत्याचार प्रकरण : आरोपी दत्तात्रय गाडेची होणार डीएनए चाचणी
ही बाब त्या जोडप्याला रूचली नाही. त्यांनी प्रमोद यांच्यावरच हल्ला केला. दगडाने ठेचून आणि गळा आवळून त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. यात ते गंभीर जखमी झाले हे पाहून जोडप्याने तिथून पळ काढला. प्रमोदवर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - पाचोडच्या बैल बाजारात मंदी! दुभत्या जनावरांचे दर घसरले, कसाईंचा भरणा वाढला
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि प्रमोद जगताप याला रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू असून प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलिस करत आहेत. या घटनेने स्थानिक नागरिक आणि दुर्गप्रेमींमध्ये मोठा संताप आहे. आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.