मुंबई :महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडोबा आणि बाणाई यांच्या अलौकिक विवाह सोहळ्यावर आधारित एक नवे गीत नुकतेच प्रसारित झाले असून, भक्तांसाठी हे एक भावनिक आणि प्रसन्नतेची भावना जागरूक करते . “नळदुर्ग नगरी हळदीने माखली” असे या गीताचे सुरेख बोल असून, यामध्ये खंडोबा आणि बाणाईच्या विवाह सोहळ्याचे मनोहारी वर्णन केले आहे.हे गीत प्रसिद्ध गीतकार-पत्रकार सुनील ढेपे यांनी लिहिले आहे. याला संगीतकार सचिन अवघडे यांनी भारदस्त संगीत दिले असून, सुप्रसिद्ध गायक संदीप रोकडे यांच्या सुमधुर आवाजाने या गीताला खास रंगत आणली आहे.
श्री खंडोबा हे भगवान महादेवाचे एक सगुण रूप मानले जातात. महाराष्ट्रातील ८ प्रमुख खंडोबा स्थानांपैकी नळदुर्ग जवळील अणदूर-मैलारपूर हे स्थान खूपच महत्त्वाचे आहे.दमयंती राणीच्या निस्सीम भक्तीने प्रसन्न होऊन खंडोबाने येथे प्रकट होऊन बाणाईसोबत विवाह केला, अशी आख्यायिका सांगितली जाते. या विवाह सोहळ्याला स्वर्गातील सर्व देवता - ब्रह्मा, विष्णू, महेश, लक्ष्मी, सरस्वती आणि इतर ३३ कोटी देव उपस्थित होते, असे म्हणतात. नारद मुनींनी या विवाहासाठी अक्षता टाकल्याचा उल्लेखही आहे.
या गीतामध्ये खंडोबा-बाणाई यांच्या पवित्र विवाहाचे मनोहर दृश्य रेखाटले गेले आहे. “नळदुर्ग नगरी हळदीने माखली, खंडोबा झालाय पिवळा, बाणाई - खंडोबाच्या लग्नाला, तेहतीस कोटी देव झाले गोळा” अशा ओळी भाविकांच्या मनात भक्तीचा एक नवा उमाळा निर्माण करतात.या गीताच्या रचना आणि सादरीकरणामुळे खंडोबाच्या भक्तांमध्ये या गीताचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.हे गीत केवळ एक मनोरंजनाचे साधन नसून, खंडोबाच्या भक्तीचा नवा आयाम आहे. नळदुर्ग नगरीच्या ऐतिहासिक महत्त्वाला आणि खंडोबा भक्तीच्या परंपरेला उजाळा देणारे हे गीत भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहे.