Saturday, January 25, 2025 07:33:43 AM

Mobile Womens Shower Van
मुंबईत महिलांसाठी पहिल्या फिरत्या स्नानगृहाचं उद्घाटन: पण समोर आली धक्कादायक माहिती

उद्घाटनानंतर हे स्नानगृह महिलांच्या सेवेत आलंच नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. उद्घाटनाच्या काही तासांतच हे स्नानगृह त्या जागेवरून हलवण्यात आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

मुंबईत महिलांसाठी पहिल्या फिरत्या स्नानगृहाचं उद्घाटन पण समोर आली धक्कादायक माहिती

मुंबई : कांदिवली पूर्वेतील हनुमान नगर परिसरात महिलांसाठी देशातील पहिलं फिरतं स्नानगृह तयार करण्यात आलं आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आणि मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या स्नानगृहांची निर्मिती करण्यात आली आहे. झोपडपट्टीमधील महिलांना या स्नानगृहाचा फायदा होणार असल्याचं सांगण्यात आलं. बुधवारी, 8 जानेवारी रोजी मंत्री मंगल प्रभात लोढा आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या उपस्थितीत कांदिवली पूर्व परिसरात या अत्याधुनिक फिरत्या स्नानगृहाचे उद्घाटन करण्यात आलं.

उद्घाटनानंतर स्नानगृह तिथेच नाही?
उद्घाटनानंतर हे स्नानगृह महिलांच्या सेवेत आलंच नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. उद्घाटनाच्या काही तासांतच हे स्नानगृह त्या जागेवरून हलवण्यात आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. उद्घाटनाच्या वेळी हजर असलेलं स्नानगृह नंतर गायब झाल्याने नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

स्नानगृहाचा शोध घेतला असता
स्नानगृहाचा शोध घेण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला तेव्हा हे फिरतं स्नानगृह कांदिवली रेल्वे स्थानकाजवळील बस डेपोमध्ये उभं असल्याचं समजलं. मात्र, तिथेही एक धक्कादायक माहिती समोर आली. हे स्नानगृह असलेल्या बसवर टीसी नंबर म्हणजेच तात्पुरता व्यापार परवाना क्रमांक असल्याचं निदर्शनास आलं. टीसी नंबर हा फक्त तात्पुरत्या स्वरूपासाठी दिला जातो. मात्र, या बसच्या बाजूला अधिकृत क्रमांकही लावण्यात आला होता. त्यामुळे कोणता क्रमांक खरा मानायचा, हा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे.

👉👉 हे देखील वाचा : ठाकरे गटाचे अनेक माजी नगरसेवक भाजपाच्या वाटेवर

सुविधांचा अभाव
उद्घाटनाच्या वेळी जनरेटर व्हॅन आणि पाण्याची सोय करण्यात आली होती, परंतु डेपोजवळ त्या सुविधाही दिसल्या नाहीत. उद्घाटनासाठी इतकी घाई का करण्यात आली, हे समजत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. हे स्नानगृह खरंच महिलांसाठी कार्यरत आहे का, असा प्रश्न आता स्थानिक नागरिकांमध्ये गाजत आहे.

उद्घाटनावर प्रश्नचिन्ह
हे स्नानगृह तातडीने का हलवण्यात आलं? त्याचा उपयोग स्थानिक महिलांना कसा होणार? उद्घाटनावेळी वाजतगाजत झालेला हा कार्यक्रम केवळ दिखावा होता का, अशी चर्चा सध्या स्थानिकांमध्ये सुरू आहे. उद्घाटनानंतर लगेचच या प्रकारामुळे मंत्री मंगल प्रभात लोढा आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या कार्यावर टीका होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
 


सम्बन्धित सामग्री