महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी 27 मार्च रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. या निवडणुकीत महायुतीतील भाजपला तीन जागा मिळणार आहेत, आणि पक्षाने आपल्या उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, या यादीत भाजपचे ज्येष्ठ आणि निष्ठावान नेते माधव भंडारी यांना पुन्हा एकदा डावलण्यात आले आहे. दिल्लीतून पाठवलेल्या शिफारस यादीत त्यांचे नाव चर्चेत होते. मात्र,अंतिम निर्णयात त्यांना संधी न मिळाल्याने पक्षातील जुने-जाणते कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जात आहे.
माधव भंडारी यांनी भाजप आणि संघ परिवारात दीर्घकाळ योगदान दिले आहे. 2014 पासून भाजप सत्तेत असतानाही त्यांना महत्त्वाचे पद मिळू शकले नाही. विधानपरिषद किंवा राज्यसभेसाठी प्रत्येकवेळी त्यांचे नाव चर्चेत येते, मात्र निर्णयाअंती त्यांना डावलले जाते. यावेळीही त्यांची संधी हुकल्याने पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: उद्योगपती गौतम अदानींनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राष्ट्रवादीतून कोणाला मिळणार विधानपरिषदेची संधी?
दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडेही एक जागा आहे. यासाठी पक्षाच्या कोअर कमिटीने झिशान सिद्दीकी, संजय दौंड आणि उमेश पाटील यांना उमेदवारी अर्ज भरायला सांगितले आहे. यापैकी एकाला विधानपरिषदेत संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
राजेश विटेकर यांच्या विधानसभेत निवड झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. या एका जागेसाठी 100 हून अधिक इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. त्यामुळे अजित पवार कोणाच्या बाजूने निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीचं वेळापत्रक:
• अर्ज भरण्याची शेवटची तारीख: 17 मार्च
• मतदान प्रक्रिया: 27 मार्च