पुणे : ‘राज्यातील एक मंत्री खूप बोलतो. हा मंत्री बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो. चार ते सहा महिन्यात या मंत्र्यांची विकेट पडणार’, असं मोठं वक्तव्य शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. पुण्यात झालेल्या पक्षाच्या एका बैठकीत सुप्रिया सुळे बोलत होत्या.
त्यावेळी सुप्रिया सुळेंनी मोठं वक्तव्य केलं. दरम्यान, पुण्यातील पक्षाच्या बैठकीत सुप्रिया सुळेंनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांचा रोख नेमका कोणत्या मंत्र्यांकडे आहे, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होताना दिसतेय. ‘100 दिवसांत एक बळी गेला, सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार.. नाव आताच जाहीर करणं योग्य नाही’, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. इतकंच नाहीतर जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, त्याचा बळी जाणार, असं सूचक वक्तव्य देखील सुप्रिया सुळे यांनी केलं.
हेही वाचा - अंजली दमानियांनी दिला शरद पवारांना सल्ला
‘राज्यातील एक मंत्री खूपच बोलत आहेत. हे डरपोक मंत्री कोण हे संपूर्ण महाराष्ट्राला लवकरच कळणार आहे. चार ते सहा महिन्यात या मंत्र्यांची विकेट पडेल. बरं झालं पक्ष फुटला. 2 मुलं असलेल्या बायकोच्या गाडीत हा मंत्री बंदूक ठेवू शकतो. अशा फालतू माणसाबरोबर काम करणं शक्य नाही’, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. सुळे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांचा रोख नेमका कोणत्या मंत्र्यांकडे आहे, याची चर्चा सध्या लोकांमध्ये होताना दिसतेय.
बीड प्रकरणानंतर तीन महिन्यांतर धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यासाठी अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि बीडमधील मस्साजोग गावचे ग्रामस्थ यांनी पाठपुरावा केला होता. तसेच, दमानिया यांनी मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर त्यांना आमदारकीचाही राजीनामा द्यायला लावल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे म्हणत रणशिंग फुंकले होते. यानंतर दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप करणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांच्या विरोधातही आघाडी उघडली होती. याशिवाय, काही दिवसांपूर्वी भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावरही एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप झाला होता. तेव्हाही दमानिया यांनी युती सरकारवर जोरदार टीका केली होती. तसेच, विरोधीही पक्षांनीही या दोन्ही आमदारांवरून सरकारवर हल्ले चढवले होते.
हेही वाचा - Delhi CMOसह सर्व मंत्र्यांच्या कार्यालयांतील डॉ. आंबेडकरांच्या फोटोंच्या जागी पंतप्रधान मोदींचे फोटो, विधानसभेत गदारोळ