पुणे : ससून रुग्णालयातील भोंगळ कारभार वारंवार उघडकीस येत आहे. मागील वर्षभरापासून विविध प्रकरणात ससूनमधील अनेक गैरप्रकार चव्हाट्यावर आले आहेत. त्यात आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. ससून रुग्णालयातील डॉक्टर बेवारस रुग्णांवर उपचार करण्याऐवजी रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी सोडून येतात. हा प्रकार वंचित आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांनी उघडकीस आणला आहे. त्यानुसार ससूनमधील डॉक्टर व त्याच्या सहकाऱ्यांवर मंगळवारी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दादासाहेब गायकवाड हे बेवारस रुग्णांची सेवा करतात. रस्त्यावर बेवारस पडलेल्या जखमी व्यक्तींना ते ससून रुग्णालयात दाखल करतात. दीड वर्षांपूर्वी अशाच एका बेवारस रुग्णाला त्यांनी ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. परंतु दुसऱ्या दिवशी त्या रुग्णाला पाहण्यासाठी गेल्यावर त्यांना तो रुग्ण गायब झाल्याचे लक्षात आले. या संदर्भात चौकशी केल्यावर त्या रुग्णाला रात्री डॉक्टर घेऊन गेले परत आणले नाही. अशी माहिती मिळाली. यावरून बेवारस रुग्णांसंदर्भात काहीतरी गैरप्रकार ससून रुग्णालयात सुरू आहे, अशी माहिती मिळाली. हा प्रकार उघडकीस आणण्यासाठी त्यांनी रितेश यांच्यासोबत ससून रुग्णालयाबाहेर काही दिवसांपासून पाहणी सुरू केली. त्यानुसार सोमवारी पहाटे दीड वाजता रितेश रिक्षा घेऊन ससून रुग्णालयाबाहेर उभा होता. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी एका रुग्णाला सोडून यायचे आहे, येणार का अशी चौकशी केली. कुठे सोडायचे अशी विचारल्यावर 'इथून लांब नेऊन सोड,पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला नाही पाहिजे अशा ठिकाणी सोडायला सांगितले'. 'नेमके कुठे सोडू? मी एकटा कसा सोडवू, नातेवाईक पाहिजे सोबत' असे विचारल्यावर तू नवीन आहेस, आमचा नेहमीचा रिक्षावाला पाचशे रुपये दिले की बरोबर सोडून येतो असे डॉक्टरानी रितेशला सांगितले.
काही वेळाने डॉक्टरानी सांगितल्यानुसार नवीन बिल्डिंगमधला दोन्ही पाय नसलेला, हातात सुई व विविध ठिकाणी जखमी झालेला एक रुग्ण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रिक्षात ठेवला. त्या रुग्णाना घेऊन रिक्षासोबत डॉक्टर व त्यांचा सहकारी विश्रांतवाडी येथील एका दाट वडाच्या झाडाजवळ पोहचले. अंधारात व पावसात त्या रुग्णाला त्या झाडाखाली सोडून डॉक्टर निघून गेले. काही वेळाने रितेशने पोलिसांना याबाबत माहिती दिली व दादासाहेब गायकवाड यांच्या मदतीने त्या रुग्णाला पुन्हा ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच येरवडा पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार केली. त्यानुसार रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेवारस रुग्णांना ससून रुग्णालयात योग्य उपचार मिळत नाही तसेच त्यांना उपचार देण्याऐवजी स्वतः डॉक्टर त्यांना बाहेर मरणासाठी सोडून येतात. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. याबाबत चौकशी करावी म्हणजे पुढे असे घडणार नाही. हा प्रकार अतिशय गंभीर असून वैद्यकीय सेवेला काळिमा फासणारा घटना आहे. स्वतः डॉक्टर असे कृत्य करत असतील तर रुग्णांनी जायचे कुठे? गरीब व बेवारस रुग्णांना न्याय मिळणार कसा ? असे प्रश्न या घटनेतून उपस्थित होत आहेत. या घटनेची चौकशी करून डॉक्टर व सर्व कर्मचाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. तसेच आतापर्यंत असे किती रुग्णांना बाहेर सोडले याची चौकशी करणे गरजेचे आहे.