पुणे : पुण्यातील येरवडा, कोंढवा आणि फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड (Vehicles vandalized) झाल्याची माहिती समोर आली आहे. परवा रात्री बिबेवाडी परिसरात 50 ते 60 वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकारामागे नेमका कुणाचा काय हेतू आहे, हे अद्याप कळलेले नाही. तरीही दहशत माजवण्याच्या हेतूने ही तोडफोड केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
काल रात्री पुन्हा शहरात तीन ठिकाणी गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. येरवडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लक्ष्मीनगर येथे वाहन तोडफोडीची घटना घडली. घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी पंचनामा केला. यामागे कोण आहे याचा तपास सुरू आहे. दरम्यान, अज्ञात लोकांनी एकूण 20 ते 22 वाहनांची तोडफोड केली होती, अशी माहिती मिळाली आहे.
हेही वाचा - VIDEO : एकाच मार्गावर आल्याने 2 ट्रेन समोरासमोर धडकल्या, भीषण अपघातात मोठे नुकसान
नागरिकांमध्ये घबराट
येरवडासह फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कागदीपुरा साततोटी चौकी येथे 4 ते 5 वाहनाची तोडफोडीचा प्रकार आहे. त्यामुळे फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिक देखील भीतीच्या वातावरण आहे. वाहनाची तोडफोडीच्या या प्रकरणात एकूण 5 आरोपी अटकेत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परवा रात्री देखील बिबवेवाडी परिसरात देखील गाड्यांची तोडफोड झाली होती. त्यावेळी पोलिसांनी निरंजन देवकर, अभिषेक पांढरे, गणराज सुनील ठाकर अशा तीन आरोपींना अटक केली होती.
हेही वाचा - कशी नशिबानं थट्टा आज मांडली! शिकार आणि शिकारी एकाच विहीरीत; रानडुकराचा काळ आला होता, पण..
दहशत माजवण्याचा हेतू
दहशत माजवण्याच्या हेतूने ही तोडफोड केल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, तीन तरुणांनी हातात कोयता आणि लांब बांबू घेऊन गाड्यांची तोडफोड केली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. लाकडी बांबू आणि धारदार शस्त्राने गाड्यांची तोडफोड केली आहे. या घटनेनंतर पोलीस सतर्क झाले आहेत. या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.