रायगड / पुणे : रायगड आणि पुणे जिल्हाधिकारी यांचे बंदी आदेश झुगारून वरंध घाटमार्गावरून राजरोसपणे वाहतूक सुरू आहे. मात्र याकडे प्रशासनाबरोबरच पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. कोसळणाऱ्या दरडी, ठिकठिकाणी खचलेला रस्ता यामुळे वरंध घाटमार्गावरील प्रवास अत्यंत धोकादायक बनला आहे. त्यामुळे पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी मागील महिन्यात, तर रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी या महिन्यात अधिसूचना काढून हा घाटमार्ग सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी बंद केला आहे. परंतु या मार्गावरून प्रवासी वाहतूकीबरोबरच मालवाहतूकदेखील सर्रास सुरू आहे. या मार्गावर वाहतूक बंद केल्याचा कुठलाही फलक नाही की प्रतिबंध करण्यासाठी पोलीस यंत्रणा तैनात नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत वाहनचालक या धोकादायक मार्गावरून प्रवास करीत जीवावर खेळत असल्याचे चित्र आहे.
महत्त्वाचे मुद्दे -
वरंध घाट बंद तरीही वाहतूक सुरूच
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशाला केराची टोपली
प्रशासन, पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष