मुंबई : अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवर सध्या सुरू असलेल्या सवलतीच्या दरानेच आणखी एक वर्षभर पथकर आकारणी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूच्या वापराकरिता यापुर्वी 4 जानेवारी 2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत एमएमआरडीएने प्रस्तावित केलेल्या दराच्या 50 टक्के सवलतीच्या दराने पथकर (कमीत कमी 250 रुपये इतका) आकारणीचा निर्णय घेण्यात आला होता. या दराचा एक वर्षानंतर आढावा घेण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. त्यानुसार आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी एक वर्षभर म्हणजेच 31 डिसेंबर 2025 पर्यंत सध्या सुरु असलेल्या सवलतीच्या दरानेच पथकर आकारणीस मान्यता देण्यात आली.
हेही वाचा : मुंबईत ग्रंथोत्सवाचे आयोजन; कोणत्या दिवशी होणार ग्रंथोत्सव?
मुंबई महानगर विकास प्राधिकरणातर्फे उभारण्यात आलेला हा सुमारे 22 किलोमीटर लांबीचा अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू प्रकल्प 13 जानेवारी 2024 पासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.