आर्थिक चणचणीमुळे योजना बंद होण्याची शक्यता
पाडव्याला आता आनंदाचा शिधा मिळणार नाही?
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२२ मध्ये तत्कालीन महायुती सरकारने सुरू केलेली आनंदाचा शिधा योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे. राज्यातील प्राधान्य व अंत्योदय रेशनकार्डधारकांना दिवाळी, गुढीपाडवा आणि इतर सणांमध्ये स्वस्त दरात शिधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. मात्र, आर्थिक चणचणीमुळे ही योजना बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे समजते.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे साडेपाच लाख रेशनकार्डधारकांना १०० रुपयांत १ किलो साखर, १ किलो चणाडाळ, १ किलो रवा आणि १ लिटर तेल मिळणार नाही. त्यामुळे यंदाचा गुढीपाडवा अनेक कुटुंबांसाठी शिधाविना साजरा करावा लागणार आहे.
गरीबांसाठी दिलासा, पण आता काय?
राज्यातील गरिबांसाठी दिवाळी आणि गुढीपाडवा यांसारख्या सणासुदीच्या काळात आनंदाचा शिधा ही योजना महत्त्वाची होती. गरीब कुटुंबांना स्वस्तात आवश्यक शिधा मिळावा, यासाठी सरकारने ही योजना राबवली होती. मात्र, सध्या आर्थिक भार वाढल्यामुळे सरकारने ही योजना बंद करण्याचा विचार सुरू केला आहे.
जिल्ह्यात किती जणांना मिळाला शिधा?
तालुकानुसार लाभार्थी:
अ.धा.वि.अ. – १ लाख सहा हजार
शहर – ५९,०००
फुलंब्री – २५,०००
सिल्लोड – ४८,०००
सोयगाव – २१,०००
कन्नड – ५५,०००
खुलताबाद – १९,०००
वैजापूर – ५१,०००
गंगापूर – ५०,०००
पैठण – ६२,०००
➡️ एकूण सरासरी: ५ लाख लाभार्थी
३० कोटींचा शिधा वाटप!
२०२२ पासून आतापर्यंत जिल्ह्यातील ६७,००० अंत्योदय रेशनकार्डधारक आणि ४ लाख ३३ हजार प्राधान्य कुटुंब रेशनकार्डधारकांना एकूण ३० कोटी रुपयांचा शिधा वितरित करण्यात आला आहे.
मात्र, योजनेच्या बंद होण्याने गरीब कुटुंबांना मोठा फटका बसणार आहे. आता सरकार यावर काय तोडगा काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.