Monday, February 10, 2025 12:32:47 PM

School van overturned in Gondia
गोंदियात स्कुल व्हॅन पलटी होऊन 10 विद्यार्थी जखमी

शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल व्हॅन पलटी झाल्याने 10 विद्यार्थी जखमी झाले आहेत.

गोंदियात स्कुल व्हॅन पलटी होऊन 10 विद्यार्थी जखमी

गोंदिया: गंगाझरी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सेजगाव ते नहरटोला मार्गावर आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास एक गंभीर अपघात घडला. काचेवानी येथील एका खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल व्हॅन पलटी झाल्याने 10 विद्यार्थी जखमी झाले आहेत.

 

अपघाताची माहिती मिळताच गंगाझरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वाहनचालकाला ताब्यात घेतले असून अपघाताच्या कारणाचा तपास सुरू आहे. स्थानिकांच्या मदतीने जखमी विद्यार्थ्यांना त्वरित रुग्णालयात हलवण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार काही विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाल्या असल्या तरी काही जणांना अधिक उपचारांची गरज आहे.

अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी वाहनाच्या वेगावर नियंत्रण न राखल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक रहिवाशांनीही या मार्गावर वाहतुकीच्या सुरक्षेची अधिक आवश्यकता असल्याचे सांगितले.

या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळकरी मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्कूल व्हॅनच्या देखरेखीबाबत अधिक काटेकोर उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. दरम्यान, पोलिस तपास सुरू असून वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.


सम्बन्धित सामग्री