Monday, July 14, 2025 06:08:00 AM

पत्र्याचं घर, अठराविश्व दारिद्र्य पण जिद्द अपार!,सख्ख्या बहिणींनी जिद्दीनं मिळवलं MPSC त यश

गरीबीशी झुंज देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत दोन सख्ख्या बहिणींनी घवघवीत यश मिळवलं. संजीवनी आणि सरोजिनी भोजने अशी त्यांची नावं आहेत.

पत्र्याचं घर अठराविश्व दारिद्र्य पण जिद्द अपारसख्ख्या बहिणींनी जिद्दीनं मिळवलं mpsc त यश
संजीवनी आणि सरोजिनी भोजने

माणसाकडं दृढनिश्चिय, जिद्द, परिश्रम आणि चिकाटी हे चार गुण असले की तो कुणाचाही विचार न करता, काहीही करु शकतो, हे आपण अनेकदा पाहिलंय. आता अशीच कहाणी सोलापुरातून समोर आली आहे. ही कहाणी आहे, गरीबीशी झुंज देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींची. संजीवनी आणि सरोजिनी भोजने या बहिणींनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत टॅक्स असिस्टंट पद मिळवलं आहे.  


छोट्याश्या घरात ६ जणांचं वास्तव 

सोलापूर शहरातील गवळी वस्तीतील 8x10 साईजच्या छोट्या पत्र्याच्या घरात भोजने कुटूंबिय राहतात. संजीवनी आणि सरोजिनी यांचे वडील ज्योतीराम भोजने यांनी केवळ पाचवीपर्यंत शिक्षण घेतले होते. आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेता आले नाही. परंतु त्यांनी मेकॅनिकल क्षेत्रात कौशल्य मिळवत एक लहानसे गॅरेज सुरू केले. घर चालवण्यासाठी त्यांना मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागत होते. आई रेश्मा या गृहिणी असून त्यांनी कुटुंबाला सक्षमपणे सांभाळलं. वडिलांचा तोडका-मोडका गॅरेजचा व्यवसाय आणि 6 जणांचे कुटुंब चालवण्यासाठी चाललेली धडपड पाहून संजीवनी आणि सरोजिनी यांनी शिक्षणाच्या जोरावर कुटुंबाच्या परिस्थितीत सुधारणा करण्याचा निर्धार केला. 

हेही वाचा - लाडक्या बहिणींना साडी देण्याचा निर्णय रखडणार


अपयश पचवत यश मिळवलं

दोन्ही बहिणींनी बीकॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 2018 पासून त्यांनी MPSC परीक्षेची तयारी सुरू केली. मात्र त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. सात वर्षांच्या प्रयत्नांमध्ये तीन वर्षे कोरोनामुळे अडथळा निर्माण झाला. तसेच आर्थिक टंचाईमुळे अभ्यासासाठी योग्य सुविधा नव्हत्या. या काळात संजीवनी आणि सरोजिनी यांनी पीएसआय, सेल्स टॅक्स, आणि टॅक्स असिस्टंट पदांसाठी परीक्षा दिल्या. पण दरवेळी काही गुणांनी अपयश पदरी पडलं. तरीही त्यांनी हार मानली नाही. सततच्या अपयशानंतरही त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले आणि अखेर यंदा MPSC च्या परीक्षेत त्यांना यश मिळालं. 

 

हेही वाचा - 16 लाखांचा हिरेजडित विदेशी चष्मा जप्त 

 

छोटसं घर, अभ्यासासाठी घर पुरेना

अभ्यासासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळं कोरोना काळात वडिलांचे मित्र ब्रह्मदेव खटके यांनी त्यांचे घर संजीवनी आणि सरोजिनी यांना अभ्यासासाठी मोफत दिले. तसेच मावस भाऊ प्रशांत बचुटे यांनी आर्थिक मदतीबरोबरच मानसिक आधार दिला. आई रेश्मा आणि आजी तारामती यांनी रोजचा स्वयंपाक, नाश्ता अभ्यासाच्या खोलीत आणून दिला. या सगळ्या मदतीमुळे संजीवनी आणि सरोजिनी यांना परीक्षेच्या तयारीत अधिक एकाग्रता ठेवता आली.

काल मंगळवारी MPSC चा निकाल जाहीर झाला आणि गवळी वस्तीतील भोजने कुटुंबाच्या घरात आनंदोत्सव साजरा झाला. मोठ्या मेहनतीनंतर संजीवनी आणि सरोजिनी यांनी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात क्लार्क म्हणून नियुक्ती मिळवली आहे. 

 


सम्बन्धित सामग्री