छत्रपती संभाजीनगर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी मुंबईतील चैत्यभूमीला अभिवादनासाठी दरवर्षी दाखल होतात. या भाविकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने विशेष व्यवस्था केली असून गुरुवारी, ५ डिसेंबर रोजी चौदा डब्यांची विनाआरक्षणाची विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे.ही विशेष रेल्वे गुरुवारी सकाळी ७ वाजता आदिलाबाद येथून निघेल. नांदेड येथे ती सकाळी ११ वाजता पोहोचेल, तर छत्रपती संभाजीनगर स्थानकावर दुपारी ४.४५ वाजता दाखल होईल. पुढे ती दादर स्थानकावर शुक्रवारी, ६ डिसेंबर रोजी पहाटे ३.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ही रेल्वे शनिवारी, ७ डिसेंबर रोजी रात्री १.०५ वाजता दादर येथून निघून, शनिवारी सकाळी ८.४५ वाजता संभाजीनगर स्थानकावर पोहोचेल.
भाविकांची गर्दी आणि त्यांना सोयीस्कर प्रवास व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने या विशेष रेल्वे गाड्या उपलब्ध केल्या आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी मुंबईला पोहोचतात, त्यामुळे गर्दी नियमनासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी प्रशासनाने ही व्यवस्था केली आहे.
प्रवाशांना या विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा, तसेच गर्दीच्या वेळी रेल्वे प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. भाविकांच्या सुखद प्रवासासाठी प्रशासनाने जाणीवपूर्वक ही व्यवस्था केली आहे.