एसटी महामंडळाने प्रवासी भाड्यात तब्बल 14.97 टक्क्यांनी वाढ केली आहे, आणि या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या भाडेवाढीचे श्रेय कोणाला द्यायचे, यावरून महायुती सरकारमधील गोंधळ उघड झाला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुरुवातीला या भाडेवाढीबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार हा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे. मात्र, या निर्णयामुळे महायुती सरकारवर टीकेची झोड उठली आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या भाडेवाढीवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे हा विषय मांडत सरकारला धारेवर धरले. वडेट्टीवार यांनी म्हटले, “जर परिवहन मंत्र्यांनी भाडेवाढीचा निर्णय घेतलेला नसेल, तर एसटी महामंडळाच्या खात्याचा कारभार कोण पाहतो? निर्णय चुकला की तो अधिकाऱ्यांवर ढकलायचा आणि चांगल्या निर्णयाचे श्रेय घ्यायचे, ही महायुती सरकारची पद्धत झाली आहे.”
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या मुद्द्यावर भाष्य केले. त्यांच्यानुसार, भाडेवाढीवर फक्त चर्चा झाली होती, परंतु अंतिम निर्णय झाला नव्हता. मात्र, या गोंधळामुळे महायुती सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
विजय वडेट्टीवार यांनी पुढे अशी मागणी केली की, “जर अजित पवार यांचा भाडेवाढीला विरोध असेल, तर हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा. तसेच, अधिकाऱ्यांनी जर परस्पर निर्णय घेतले असतील, तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.” एसटी महामंडळाला अद्याप अध्यक्ष नसल्यामुळे असे निर्णय थेट अधिकाऱ्यांच्या हातात असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीची दरवाढ केल्याने सरनाईक टीकेचे लक्ष्य बनले आहेत. सरनाईकांनी महामंडळाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे ऐकण्याऐवजी एसटीच्या नुकसानीची प्रशासकीय कारणे शोधावीत. परिवहन मंत्री महोदयांना न सांगता एसटी महामंडळ भाडेवाढ करत आहे. त्याची मंत्र्याला कारणे दिली जात आहेत ते आधी समजून घेऊयात,
इंधन महाग झाले.
देखभाल दुरुस्ती परवडत नाही.
पगारवाढ द्यावीच लागेल.
दरदिवशी तीन कोटीचा तोटा
महिन्याला 90 कोटीचे नुकसान
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.