नवी मुंबई : शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघातील शीळ-तळोजा मार्गालगतची 14 गावे नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला वनमंत्री गणेश नाईक यांनी विरोध केला आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र पाठविले आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यातील नाईक विरुद्ध शिंदे संघर्ष पुन्हा प्रकर्षाने समोर आला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
लोकसभा निवडणुकीआधी कल्याणमधल्या 14 गावांना श्रीकांत शिंदे यांनी नवी मुंबईत सामिल करून घेतले. या 14 गावांना नवी मुंबईत घेण्यास वनमंत्री गणेश नाईक यांचा विरोध आहे. या 14 गावांतल्या वनजमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचा गणेश नाईकांचा दावा आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या हद्दीत या गावांना सामील करून घेण्यास त्यांचा विरोध आहे. ही 14 गावे भौगोलिकदृष्ट्या नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट होण्यास योग्य नाहीत. या 14 गावांना नवी मुंबईत जाण्यासाठी ठाणे किंवा पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतून जावे लागते. त्यामुळे हे व्यावहारिकदृष्ट्या योग्य नाही. या गावांसाठी 6 हजार 100 कोटी रूपये एवढा खर्च आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय निधीतून एवढा खर्च करणे शक्य नाही. 2022 पासून मागणी करूनही अद्याप शासनाकडून अनुदान मंजूर झालेलं नाही. त्यामुळे ही 14 गावे नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतून वगळण्याची विनंती मंत्री गणेश नाईकांनी केली आहे.
हेही वाचा : प्रशांत कोरटकरला मुंबई उच्च न्यायालयाचा झटका
कल्याणमधून नवी मुंबईत समाविष्ट झालेली गावं
दहिसर, पिंपरी, वालिवली, भंडारली, गोटेघर, मोकाशी, उत्तरशिव, नागांव, नावाळी, नियु,नारीवली, बामाली, वाकण आणि बाजे