बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्याला लाभलेल्या सातपुडा पर्वत रांगांमध्ये वसलेल्या अंबाबरवा अभयारण्यात पर्यटनाचा टक्का वाढत चालला आहे. अंबाबरवा अभयारण्यात टायगर सफारीसाठी पर्यटक प्राधान्य देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पर्यटकांच्या वाढलेल्या टक्क्यामुळे बुलढाणा जिल्ह्याला पर्यटनाचे आणखी एक महत्त्वपूर्ण ठिकाण लाभले आहे.
सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या अंबाबरवा अभयारण्यात तब्बल 17 पेक्षा अधिक वाघ, 50 बिबटे, शेकडो अस्वल आणि विविध प्रजातींचे असंख्य वन्यप्राणी आहेत. त्याचबरोबर येथील निसर्ग संपदा पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. दूरवरून पर्यटक अंबाबरवा अभयारण्याला भेट देण्यासाठी येत आहेत. तब्बल 147 चौरस किलोमीटरच्या या विस्तीर्ण जंगलात पर्यटकांना जंगल सफारीचा आस्वाद घेता येत आहे. वनविभागाकडून येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी जंगल सफारीसाठी अनेक जिप्सी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
माय मॅजिकल मेळघाट या ऑनलाईन वेबसाईटवरून पर्यटकांना अंबाबरवा अभयारण्यात येण्यापूर्वीच आपली वाहने आरक्षित करून घेता येतात. येथे आल्यानंतर पर्यटकांना जंगल सफारीसह वाघ, बिबट्याचे दर्शन देखील होत आहे. वनविभागाकडून येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी चहा आणि नाश्त्याची सोय देखील उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे धकाधकीच्या जीवनात एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवून पर्यटक जगण्याचा आनंद लुटत असल्याचे चित्र या जंगल सफारी दरम्यान आम्हाला पाहायला मिळते.