तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी विविध ठिकाणांहून भाविक मोठ्या संख्येने येतात. यादरम्यान, नवस पूर्ण झाल्यावर भाविक आपल्या श्रद्धेने श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी दरवर्षी विविध स्वरूपातील दान अर्पण करतात. 2024-25 या कालावधीत श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी झालेल्या या दानातून मंदीर समितीला तब्बल 65 ते 70 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये सोने, चांदीच्या लहान-मोठ्या वस्तू, अभिषेक, देणग्या, सशुल्क पास आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे.
श्री तुळजाभवानी माता मंदिरामध्ये असलेल्या खुल्या आणि गुप्त दानपेट्यांमधून भाविक मोठ्या संख्येने दान करतात. त्यासोबतच, 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या एका वर्षांत दानपेटीमध्ये 48 कोटी 32 लाख दोन हजार 973 रुपयांची रोख रक्कम जमा झाली आहे. त्याव्यतिरिक्त, 17 किलो 620 ग्रॅम सोने आणि 256 किलो चांदी अर्पण करण्यात आली आहे. ही आकडेवारी केवळ मंदिराच्या उत्पन्नाचीच नाही, तर भाविकांच्या अथांग श्रद्धेची साक्ष देणारी आहे.
तुळजापूरातील प्रसिद्ध श्री तुळजाभवानी माता मंदिर हे फक्त एक धार्मिक ठिकाण नसून, एक सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक आहे. त्यासोबतच, श्री तुळजाभवानी माता मंदिर समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दानमधून मिळालेल्या उत्पन्नाचा उपयोग भाविकांच्या सुविधेसाठी, मंदिराच्या विकासकामासाठी, धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी प्रामुख्याने केला जातो.