केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना रेल्वेसाठी 2.55 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यात वाढ करण्यात आली नसली तरी या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला 6640 कोटी रूपयांचा भरीव निधी मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये देशांतर्गत रेल्वे अपघातांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे हे अपघात कमी करण्याचे तसेच ते टाळण्याचे मोठे आव्हान रेल्वे मंत्रालयासमोर आहे. अपघात रोखण्यासाठी कवच प्रणाली असली तरी आता या प्रणालीला अपग्रेड करण्यासाठी 4.O या प्रणालीचे काम जलद गतीने केले जाणार असल्याचा दावा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केला आहे.
रेल्वेसाठी 2.55 लाख कोटींची तरतूद:
पुणे मेट्रोसाठी: 837 कोटी रुपये
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेसाठी: 4 हजार 3 कोटी रुपये
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रशिक्षण संस्थेसाठी: 126 कोटी 60 लाख रुपये
मुंबई मेट्रोसाठी: 1673 कोटी 41 लाख रुपये
देशातील नवीन लोहमार्ग निर्मितीसाठी: 32 हजार 235 कोटी रुपये
लोहमार्ग दुहेरीकरणासाठी: 32 हजार कोटी रुपये
गेज कन्व्हर्जनसाठी: 4 हजार 550 कोटी रुपये
ट्रॅफिक फॅसिलिटी वर्कसाठी: 8 हजार 601 कोटी रुपये
सिग्नलिंग आणि टेली कम्युनिकेशन कामांसाठी: 8 हजार 601 कोटी रुपये
रेलपथ नूतनीकरणासाठी: 22 हजार 800 कोटी रुपये
ब्रीज, बोगदे इत्यादीसाठी: 2 हजार 169 कोटी रुपये
लोहमार्ग विद्युतीकरणासाठी: 6 हजार 150 कोटी रुपये
पीएसयु/जेव्हीसाठी: 22 हजार 444 कोटी रुपये
रोलिंग स्टॉक निर्माण कार्यासाठी: 45 हजार 550 कोटी रुपये
मुंबई उपनगरीय रेल्वेवर परिणाम काय ?
मुंबई उपनगरीय रेल्वेचे देशात विशेष महत्त्व असूनही यावेळी उपनगरीय रेल्वेसाठी अर्थसंकल्पात ठोस तरतूद नसल्याने सरकारने मुंबईकरांना नाराज केले आहे. महाराष्ट्रातील मेट्रो प्रकल्पांना वाढीव निधी मिळाला असून एकूणच रेल्वे अपघातरोधक यंत्रणा अधिक अत्याधुनिक करणार एवढ्याच जमेच्या बाजू आहेत.