अकोला: अजमेर शरीफ दर्ग्याला लक्ष्य केल्याच्या आणि संभळमध्ये मुस्लिमांवरील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर जन सत्याग्रह संघटनेने शव आंदोलन करत सरकारच्या विरोधात आपला तीव्र निषेध नोंदवला. या आंदोलनादरम्यान पाच काल्पनिक मृतदेहांचा देखावा सादर करण्यात आला. या आंदोलनातून समाजातील दु:ख आणि पीडितांच्या वेदनांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला गेला.
आंदोलकांनी अश्रू ढाळत आपल्या भावना व्यक्त केल्या आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संघटनेचा उद्देश असा होता की, एका ठिकाणी पाच मृतदेह सापडल्यास त्या भागातील वेदना समजून घेतल्या पाहिजेत, हा संदेश समाजापर्यंत पोहोचावा. त्यांनी मुस्लिमांवरील अन्यायाचा तीव्र निषेध केला आणि अशा घटना थांबवण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली.
संघटनेने यावेळी सरकारकडे दोन प्रमुख मागण्या केल्या. पहिली, अजमेर शरीफ दर्ग्याशी संबंधित याचिका तातडीने फेटाळण्यात यावी. दुसरी, लोकप्रियतेच्या हव्यासापोटी दर्ग्याला लक्ष्य करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जावी.जन सत्याग्रह संघटनेच्या मते, धार्मिक स्थळांवर होणारे हल्ले केवळ एका समुदायासाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी चिंतेचा विषय आहे. यामुळे समाजातील शांतता आणि सौहार्द बिघडते. या आंदोलनाद्वारे त्यांनी सरकारकडून न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आणि सामाजिक सलोख्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आवाहन केले.