पंढरपूर: आज अवघी पंढपूर नगरी दुमदुमून निघाली. कारण पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडला. मंगलाष्टका त्याच बरोबर देवा ब्राम्हणांच्या साक्षीने धुमधडाक्यात विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला हजारो भाविक भक्तांनी हजेरी लावली असून मोठ्या भक्तिमय वातावरणात हा विवाह सोहळा संपन्न झाला.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
काय आहे प्रथा:
श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा वसंत पंचमीला विवाह झाल्याची आख्यायिका आहे. या संदर्भाने श्री विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो. त्यामुळे दरवर्षी मंदिरामध्ये श्री विठ्ठल रखुमाईचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण मंदिराला आकर्षक अशी सजावट केली जाते. विवाहासाठी श्री रुक्मिणीमातेकडून देवाला पांढरा पोशाख आहेर म्हणून पाठविला जातो. तर श्री रुक्मिणीमातेला देवाकडून पैठणी पाठविली जाते. हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतो. लग्न बोहल्यावर देवाच्या प्रातिनिधिक मूर्ती उभ्या केल्या जातात व दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टका म्हटल्या जातात. आणि लग्न सोहळा पार पडला जातो.
यंदाही या विठ्ठल रुक्मिणी लग्नसोहळ्यानिमित्त अवघी पंढरपूर नगरी दुमदुमून निघाली. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते. त्याच बरोबर सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण देखील यावेळी पाहायला मिळाले. यावेळी भाविकांसाठी जेवणाच्या पंगतीचे आयोजन देखील करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा विठ्ठल-रुक्मिणी लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झालाय.