Friday, April 25, 2025 11:09:21 PM

बीडमधल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबद्दल काय म्हणाल्या तृप्ती देसाई?

बीडमधल्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांना बाहेर काढा. कर्मचाऱ्यांनाही जिल्ह्याबाहेर काढा अशी मागणी तृप्ती देसाईंनी गृहमंत्रालयाकडे केली आहे.

बीडमधल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबद्दल काय म्हणाल्या तृप्ती देसाई

पुणे : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. या हत्येला तीन महिने होऊन गेले असून या प्रकरणातील एकेक खुलासा बाहेर येत आहे.राजकीय मंडळीसह सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत प्रकरणात लक्ष घातले जात आहे. आता तृप्ती देसाई यांनी बीडमधील पोलिसांवर आरोप  केले आहेत. 

बीडमधल्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांना बाहेर काढा. कर्मचाऱ्यांनाही जिल्ह्याबाहेर काढा अशी मागणी तृप्ती देसाईंनी गृहमंत्रालयाकडे केली आहे. कराडला मदत करणाऱ्या 26 पोलिसांची यादी जाहीर  केली होती. यानंतर बीड पोलिसांना नोटीस बजावली होती. नोटीशीला उत्तर देण्यासाठी तृप्ती देसाई 17 मार्चला बीडमधील पोलीस अधीक्षक कार्यालयात जाणार आहेत. 

काय म्हणाल्या तृप्ती देसाई? 

बीड जिल्ह्याचा गुंडाराज रोखायचा असेल तर या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बीड बाहेर घालवण्याची वेळ आली आहे. वाल्मिक कराडला मदत करणाऱ्या बीड जिल्ह्यातील 26 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी मी जाहीर केली होती. याबाबत गृहमंत्रालय आणि पोलीस अधीक्षक बीड यांना देखील तक्रार दिली होती.  जे आरोप मी केले होते त्या संदर्भातले पुरावे घेऊन येण्यासाठी बीड पोलिसांनी मला नोटीस पाठवली आहे. या नोटीशीला उत्तर देण्यासाठी आणि सगळ्या बाबतीतले पुरावे घेऊन 17 मार्च रोजी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहणार असल्याचे तृप्ती देसाई यांनी म्हटले. 

हेही वाचा : कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देताना कोर्टाचं महत्वपूर्ण निरीक्षण
 
'बीडमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पुरावे...' 
बीडमध्ये वाल्मिक कराडच्या मर्जीनुसार अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोलीस स्टेशनमध्ये वर्षानुवर्षी काम करतात. अनेक गुन्हेगारांना त्यांनी पाठीशी घातलं आहे.  माझ्याकडे या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे अनेक पुरावे ऑडिओ ,व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध आहेत. हे सर्व घेऊन मी बीडला जाणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. गृहमंत्री आणि बीडच्या पोलीस अधीक्षकांना माझी विनंती आहे. तुम्हाला जे पुरावे हवे आहेत. ते पुरावे देते पण जे दोषी आहेत.  त्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बीड जिल्ह्याच्या बाहेर काढा. जे दोषी आहेत त्यांचं निलंबन होणं गरजेचं असल्याचे देसाई यांनी म्हटले. 


सम्बन्धित सामग्री